इम्रान खान घेणार स्वातंत्र्य दिनापूर्वी शपथ

पीटीआय
सोमवार, 30 जुलै 2018

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार "पीटीआय'ला 116 जागा मिळाल्या आहेत. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगला 64, तर माजी अध्यक्ष असीफ झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 43 जागा मिळाल्या आहेत.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून इम्रान खान हे 14 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनापूर्वी शपथ घेतील, असे त्यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाने जाहीर केले आहे. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर हा पक्ष अद्यापही बहुमतासाठी छोट्या पक्षांशी चर्चा करत आहे. 

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार "पीटीआय'ला 116 जागा मिळाल्या आहेत. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगला 64, तर माजी अध्यक्ष असीफ झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 43 जागा मिळाल्या आहेत. इम्रान यांच्या पक्षाला बहुमतासाठी अजून किमान वीस जणांच्या पाठिंब्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी निवडून आलेल्या इतर पक्षांच्या 47 जणांशी चर्चा सुरू असल्याचे "पीटीआय'च्या प्रवक्‍त्यांनी सांगितले. ही चर्चा लवकरच सफल होऊन 14 ऑगस्टपूर्वी इम्रान खान यांचा पंतप्रधानपदासाठी शपथविधी होईल, असे या वेळी सांगण्यात आले. 

दरम्यान, कराची आणि सियालकोट येथे रस्त्याच्या कडेला पाच रिकाम्या मतपेट्या आणि बाहेर पडलेल्या मतपत्रिका सापडल्याने गैरप्रकार झाला नसल्याच्या निवडणूक आयोगाच्या दाव्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मतदारांनी स्पष्ट बहुमत न दिल्याने निवडणुकीनंतरही येथील राजकीय वातावरण तापलेलेच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan will take oath before independence day