esakal | भारत, बांगलादेशला हवे शांतता अन् स्थैर्य - पंतप्रधान
sakal

बोलून बातमी शोधा

ओराकांडी (बांगलादेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुरु हरिचंद ठाकूर यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले.

भारत आणि बांगलादेशला स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी असून ही दोन्ही राष्ट्रे स्वतःच्या प्रगतीमधून जगाचा विकास साधू इच्छित असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

भारत, बांगलादेशला हवे शांतता अन् स्थैर्य - पंतप्रधान

sakal_logo
By
पीटीआय

ढाका - भारत आणि बांगलादेशला स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी असून ही दोन्ही राष्ट्रे स्वतःच्या प्रगतीमधून जगाचा विकास साधू इच्छित असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. सध्या बांगलादेश दौऱ्यावर आलेल्या मोदींनी आज दुसऱ्या दिवशी गोपालगंजमधील ओराकांडी येथील मतुआ समुदायाचे दैवत असणाऱ्या आध्यात्मिक गुरू हरिचंद ठाकूर यांच्या जन्मस्थळाला भेट दिली.

मोदी म्हणाले की, ‘भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना स्वतःच्या प्रगतीमधून जगाची प्रगती साधायची आहे. उभय देशांना स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी आहे. या स्थळाला भेट देण्याची आपली खूप वर्षांपासूनची इच्छा होती. आपल्या २०१५ च्या बांगलादेश दौऱ्यामध्येही आपण ती बोलून दाखविली होती. आज तीच गोष्ट सत्यात अवतरली आहे. ओराकांडीमध्ये आल्यानंतर भारतातील मतुआ समुदायाच्या लोकांना जे वाटते तीच भावना आज येथे आल्यानंतर माझ्या मनात निर्माण झाली आहे. येथे मुलींसाठी प्राथमिक शाळा उभारण्याचा आमचा विचार आहे. कोरोनाच्या काळामध्ये भारत आणि बांगलादेशने स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. हे दोन्ही देश संकटाचा मोठ्या ताकदीने सामना करत आहेत. भारत देखील स्वदेशी बनावटीच्या लशी बांगलादेशला देतो आहे.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वंगबंधूंना अभिवादन
पंतप्रधान मोदींनी आज तुंगीपाडा येथील वंगबंधू शेख मुजिबूर रहेमान यांच्या स्मारकस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या देखील उपस्थित होत्या. रहेमान यांच्या अन्य एक कन्या शेख रेहाना देखील यावेळी उपस्थित होत्या. दरम्यान वंगबंधू यांच्या स्मारकाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जशोरेश्‍वरी मंदिराला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील ईश्‍वरीपूर खेड्यातील जशोरेश्‍वरी मंदिराला भेट देत पूजाअर्चना केली. हे मंदिर शतखिरा जिल्ह्यामध्ये आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे मास्क घालूनच मोदींनी मंदिरामध्ये पूजाविधी केले. देवीच्या ५१ शक्तीपिठांमध्ये जशोरेश्‍वरी मंदिराचा देखील समावेश होतो. सोळाव्या शतकामध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मोदींच्या आगमनामुळे आज या मंदिराचा चेहरामोहराच बदलून गेला होता. स्थानिकांनी मंदिर परिसर फुलांनी सजविला होता. मोदींनी यावेळी सोने आणि चांदीने मढविलेला मुकुट देवीला अर्पण केला. या मुकुटाच्या निर्मितीसाठी तब्बल तीन आठवडे लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. 

Edited By - Prashant Patil

loading image