भारत 2020 पर्यंत होणार सर्वाधिक तरुण देश

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

आमची लोकशाही ही आमच्या विकासासाठी आहे, असे संधू यांनी सांगितले.

कोलंबो : भारतामध्ये 2020 पर्यंत तरुणांची सर्वाधिक संख्या होणार असून, भारत हा जगातील सर्वांत तरुण देश बनणार आहे. तेव्हा भारतातील लोकसंख्येचे सरासरी वय 29 असेल, अशी माहिती भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिली. 

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 64 टक्के लोक काम करणाऱ्या वयोगटात असतील. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त तरणजितसिंह संधू यांनी परराष्ट्र धोरणावर व्याख्यान देताना वरील प्रतिपादन केले. 

ते म्हणाले, "पश्चिम युरोपासह अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान आणि चीनचेही सरासरी वय वाढत चालले आहे. या तरुण लोकसंख्येची सुप्त शक्ती भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढविण्याची संधी देत आहे."

देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या विकासासंबंधीच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आमची लोकशाही ही आमच्या विकासासाठी आहे, असे संधू यांनी सांगितले. भारताचे परराष्ट्र धोरण अधिक क्रियाशील झाले असून आणि भारताच्या नेतृत्वाचे जगाने कौतुक केले आहे. भारत आणि श्रीलंका संबंधांमध्ये मोठी संधी आहे, असे ते म्हणाले. 
 

Web Title: india to be youngest country by 2020