
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे आरोप केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दरम्यान कॅनडाकडून करण्यात आलेले हे आरोप कॅनडामधील भारतीय अधिकाऱ्यांच्या इंटरसेप्ट केलेल्या संभाषणाच्या आधारे करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
कॅनडामधील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की कॅनडाने काही भारतीय अधिकाऱ्यांचे संभाषण इंटरसेप्ट करण्यात आलं आणि त्या आधारावर भारतावर हे आरोप करण्यात आले आहेत. या कामात एका पाश्चात्य देशांनी कॅनडाला मदत केल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
कॅनडामधील वृत्तवाहिनी सीबीसी न्यूजने गुरूवारी दावा केला आहे की कॅनडाच्या तपास यंत्रणांनी महिनाभराच्या तपासानंतर मानवीय आणि सिग्नल संबंधीत गुप्त माहिती गोळा केली आहे. यामध्ये भारतीय अधिकारी, ज्यामध्ये भारतीय राजदूत यांचा देखील समावेश आहे, यांच्यामधील संभाषण इंटरसेप्ट करण्यात आले होते. त्याच्या आधारावर कॅनडाने हे आरोप लावले आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये इतर पाश्चिमात्य देशांनी या कामात कॅनडाची मदत केल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की फाइव्ह आइज गटामध्ये सहभागी एका देशाने कॅनडाला काही इनपुट पुरवले आहेत. फाइव्ह आइज या गटात कॅनडासोबतच अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचादेखील समावेश आहे.
कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस ऑगस्टमध्ये चार दिवसांच्या आणि सप्टेंबर मध्ये पाच दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले होते असेही सीबीसीच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच मीडिया रिपोर्टमध्ये हा देखील दावा केला आहे की, खुद्द भारतीय अधिकाऱ्यांनी निज्जरच्या हत्येत सहभागी असल्याचे नाकारले नाहीये.
ट्रूडोंकडून पून्हा आरोपांचा पुरनरोच्चार
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी त्यांच्या देशाच्या संसदेत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये केलेले दावे पुराव्यावर आधारित आहेत. ट्रूडो म्हणाले की मी तुम्हाला खात्री देतो की हाऊस ऑफ कॉमन्समध्ये केलेले आरोप हलक्यात केले गेले नाहीत, ते अत्यंत गांभीर्याने केले गेले आहेत.
ट्रूडो म्हणाले की, जी-20 परिषदेदरम्यानही त्यांनी पंतप्रधान मोदींशी याबद्दल बोलून आपल्या चिंता त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. ट्रूडो म्हणाले की, भारताने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि जबाबदारी आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी आमच्यासोबत काम करावे. मात्र भारताने यापूर्वीच कॅनडाने लावलेले आरोप फेटाळले आहेत.