India: चीन सीमेवर भारतीय हवाई दल सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air Force Aeroplane

चीन सीमेवर भारतीय हवाई दल सज्ज

नवी दिल्ली : भारतीय हवाई दल सीमेवरील चीनच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यास संपूर्ण सज्ज असल्याचा ठाम विश्वास भारतीय हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी व्यक्त कला आहे. ‘टू फ्रंट वॉर' परिस्थिती उद्भवली आणि पाकिस्तानने परकी तंत्रज्ञान चीनला पुरवले तर भारतासाठी तो थोडा चिंतेचा विषय ठरू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

हवाई दलाच्या ८९ व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना एअर मार्शल चौधरी यांनी, चिनी हवाई दलाचे सैनिक अजूनही प्रत्यक्ष ताबारेषेच्या (एलओसी) तीन हवाई तळांवर आहेत, असे सांगितले. हे सैनिक कोणतीही आगळीक करतील तर त्यांना तेथल्या तेथे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जवानही सज्ज आहेत, असे सांगून ते म्हणाले की चिनी सैनिकांच्या या तीन हवाई तळांवरील उपस्थितीमुळे चिंता करावी असे काही नाही. भारताने हिमालयाच्या उंचीवरील तळांवर आपली उपस्थिती वाढविल्यावर चीनची क्षमता कमी होत जाईल.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल व अपाचे या सारख्या लढाऊ विमानांची भर पडली आहे. त्यामुळे शस्त्रसज्जतेत वृद्धी झाली आहे. पाकिस्तान व व्याप्त काश्मीरमध्येही चीनच्या मदतीने धावपट्टी तयार होत आहे. मात्र या धावपट्टीमुळे भारताला कोणतिही चिंता नाही. कारण मुळात एक तर ही धावपट्टी फार उंचावर नाही. शिवाय ती अगदी छोटी आहे. त्यावरून जेमतेम काही हेलिकॉप्टर उड्डाण करू शकतात. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेच्या जवळ जी लढाऊ विमानांची धावपट्टी बनविली आहे ती त्यांच्याच सीमावर्ती भागातील नागरिकांच्या रक्षणासाठी असावी, असेही चौधरी यांनी सांगितले.

एअर मार्शल चौधरी म्हणाले, की पाकिस्तान-चीन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढण्याची वेळ आली तरी भारतीय हवाई दलाची सज्जता आहेच. ‘टू फ्रंट वॉर’च्या परिस्थितीत आणखी सामर्थ्याने लढण्यासाठी हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्यांची आवश्यकता आहे. ते म्हणाले, की सुरक्षा क्षेत्रच नव्हे तर जियो-पॉलिटिकल क्षेत्रातही बदल झाले आहेत आणि हवाई दलासमोरील आव्हाने वाढली आहेत. मात्र हवाई दल मुकाबला करण्यास सक्षम आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. नजीकच्या काळात ११४ नवी लढाऊ जेट विमाने, रशियाकडून मिळणारी एस-४०० अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आदींनी हवाई दलाची मारक क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढेल असेही ते म्हणाले.

‘नियमानुसार चाचणी झालेली होती‘

हवाई दलाच्या ज्या महिला अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्याविरूद्ध बलात्काराची तक्रार दिली त्या अधिकाऱ्यांची लष्करी रुग्णालयाविरूद्धची तक्रार निराधार होती, असे चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले, की या महिला अधिकाऱ्याने तक्रार केल्यावर त्यांची नियमानुसार संपूर्ण वैद्यकीय चाचणी (टू-फिंगर टेस्ट) झालेली होती. या प्रकरणी सैन्यदलांच्या नियमांप्रमाणे चौकशी होईल व दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाईही होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.