लडाखमधील घुसखोरीबाबत माहिती नाही - चीनचे कानावर हात

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

मला या घुसखोरीबाबत पूर्वकल्पना नव्हती, आमचे सैन्य हे सीमेवरील शांततेसाठी सदैव कटिबद्ध आहे. आमचे लष्कर नेहमीच थेट ताबा रेषेवर गस्त घालत असते. भारताने नियंत्रण रेषेचा आदर करावा असेही आम्हाला वाटते

बीजिंग - लडाखमध्ये पेगॉंग सरोवराच्या काठावरून "पीपल्स लिबरेशन आर्मी'ने भारतीय हद्दीमध्ये केलेल्या घुसखोरीबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही, असे सांगत चीन सरकारने आपण सीमेवरील शांततेसाठी कटिबद्ध आहोत, असा उलटा कांगावा केला. तत्पूर्वी भारतीय लष्कराने मंगळवारी चिनी सैनिकांचा लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा डाव उधळून लावला होता. या वेळी दोन्ही गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत काही जवान किरकोळ जखमी झाले होते.

याबाबत चीनचे प्रवक्‍ते हुआ चूनयिंग यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्‍न विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ""मला या घुसखोरीबाबत पूर्वकल्पना नव्हती, आमचे सैन्य हे सीमेवरील शांततेसाठी सदैव कटिबद्ध आहे. आमचे लष्कर नेहमीच थेट ताबा रेषेवर गस्त घालत असते. भारताने नियंत्रण रेषेचा आदर करावा असेही आम्हाला वाटते.'' यापूर्वी चीनने आपल्या घुसखोरीवर पांघरूण घालण्यासाठी सीमेवरील गस्तीचा आधार घेतला होता. सीमेवरून उभय देशांमध्ये असलेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी आतापर्यंत चर्चेच्या 19 फेऱ्या पार पडल्या आहेत. मागील तीन महिन्यांपासून डोकलाममधील तणाव कायम आहे, हा वाद सोडविण्यासाठी चीनकडून काही प्रयत्न झाले का, असा प्रश्‍न विचारण्यात आला असता त्यांनी भारतानेच या परिसरातून बिनशर्त माघार घ्यावी, असे तुणतुणे वाजविले.

शांततेचा आग्रह
प्रादेशिक शांतता आणि विकासासाठी अनुकूल असे संबंध विकसित करण्यात अमेरिका आणि भारत प्रभावी भूमिका पाडू शकतात, असा सूर चीन सरकारने आळवला आहे. भारत प्रशांत भागामध्ये शांतता आणि स्थैर्य नांदावे म्हणून उभय देशांना पुढाकार घेतला असून, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात या अनुषंगाने चर्चाही झाली होती. भारत आणि अमेरिकेत होऊ घातलेल्या मंत्रिस्तरीय चर्चेवर भाष्य करताना चुनयिंग म्हणाले की, ""आम्हाला ही बाब समजली असून भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी अनुकूल ठरतील अशी आम्हाला आशा आहे.''

Web Title: india china doklam ladakh