भारताने पाकचे आण्विक प्रकल्प उध्वस्त केले असते...

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील आण्विक प्रकल्प एकतर पूर्णपणे उध्वस्त झाले असते; नाहीतर त्यांचे अतोनात नुकसान झाले असते. यामुळे पुढील काही वर्षांत तरी पाकिस्तानला अण्वस्त्रनिर्मिती करणे शक्‍य झाले नसते

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील महत्त्वपूर्ण आण्विक प्रकल्प भारतीय हवाई दल 1984 मध्ये उध्वस्त करु शकले असते, असे अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या "सीआयए'ने म्हटले आहे.

"सीआयए'ची 1980 च्या दशकामधील संवेदनशील कागदपत्रे आता प्रसिद्ध झाली आहेत. या कागदपत्रांमध्ये हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सीआयएने हे निरीक्षण नोंदविले होते.

"भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील आण्विक प्रकल्प एकतर पूर्णपणे उध्वस्त झाले असते; नाहीतर त्यांचे अतोनात नुकसान झाले असते. यामुळे पुढील काही वर्षांत तरी पाकिस्तानला अण्वस्त्रनिर्मिती करणे शक्‍य झाले नसते. दुय्यम प्रतीच्या नियंत्रण व दळवळण व्यवस्थेमुळे पाकिस्तानला भारतीय हवाई दलाचा हल्ला परतवून लावणे शक्‍य झाले नसते. भारतीय हवाई दल हे पाकिस्तानच्या तुलनेमध्ये मोठे व सक्षम होते. पाकिस्तानी सैन्यास देशातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे संरक्षण करणे शक्‍य झाले नसते. याचबरोबर, त्यांना भारतामधील संवेदनशील ठिकाणी हल्ला करणेही शक्‍य नव्हते. या हल्ल्यासाठी भारताकडून मिग-23 वा जग्वार ही विमाने वापरण्यात आली असती,'' असे सीआयएने म्हटले आहे

Web Title: India could have destroyed Pakistan's nuclear facilities in 84