सुरक्षा परिषदेत भारताची झाली निवड

Security-Council
Security-Council

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांचे शक्तिशाली अंग असलेल्या सुरक्षा परिषदेत आज भारताची अपेक्षेप्रमाणे अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीत पाच जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत १९२ सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत मास्क घालून मतदान केले. भारताच्या विजयाबद्दल अनेक देशांनी अभिनंदन केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतानेही सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. जागतिक शांततेसाठी भारत सर्व सदस्य देशांबरोबर एकत्रित प्रयत्न करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी दिली. 

आशिया-प्रशांत गटातून एकमेव उमेदवार असलेल्या भारताची निवड निश्‍चित मानली जात होती. त्याप्रमाणे आज झालेल्या मतदानात १९२ पैकी १८४ मते मिळवून भारत विजयी झाला. भारताचा दोन वर्षांचा कालावधी एक जानेवारी २०२१ पासून सुरू होईल. भारताप्रमाणेच आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे हे देशही अस्थायी सदस्य म्हणून निवडून आले. आफ्रिका गटातून जिबुती आणि केनिया हे दोन देश उमेदवार आहेत. आज झालेल्या मतदानात दोन्हींपैकी कोणत्याच देशाला विजयासाठी आवश्‍यक असलेली दोन तृतियांश मते न मिळाल्याने या निवडीसाठी मतदानाची दुसरी फेरी उद्या होणार आहे.

आजच्या निवडीमुळे भारताच्या आठव्यांदा सुरक्षा परिषदेवर निवड झाली आहे. भारताप्रमाणेच अफगाणिस्तानलाही अस्थायी सदस्यत्वाची इच्छा होती. मात्र, दुर्मिळ मैत्रीचे प्रदर्शन करत त्यांनी भारतासाठी आपला अर्ज मागे घेतला. 

सुरक्षा परिषदेचे सदस्य
अमेरिका, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि रशिया (कायमस्वरूपी सदस्य), इस्टोनिया, नायजर, सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्स, ट्युनिशिया आणि व्हिएतनाम (विद्यमान अस्थायी सदस्य), भारत, आयर्लंड, मेक्सिको, नॉर्वे, केनिया किंवा जिबुती (नवे अस्थायी सदस्य). बेल्जियम, डॉमिनीक रिपब्लिक, जर्मनी, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका या सदस्यांची मुदत या वर्षाअखेरीस संपत आहे. 

यांचीही झाली निवड
सुरक्षा परिषदेसाठीच्या मतदानाबरोबरच, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने तुर्कस्तानचे ज्येष्ठ नेते व्होल्कन बोझकीर यांची महासभेच्या पुढील सत्राचे अध्यक्ष म्हणूनही निवड केली. सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या महासभेच्या अमृत महोत्सवी सत्राचे अध्यक्षस्थान बोझकीर हे भूषवतील. याशिवाय, संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवरही १८ देशांची तीन वर्षांसाठी निवड या वेळी करण्यात आली. आज झालेल्या तिन्ही निवडणुकीसाठी सदस्य देशांना वेगवेगळी वेळ वाटून देण्यात आली होती. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन एकत्र येणे टाळले गेले. महासभेच्या सभागृहात प्रवेश मर्यादित ठेवून निकालही ऑनलाइन जाहीर करण्यात आला.

जागतिक समुदायाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. जागतिक शांतता, सुरक्षा, धोरण समंजसता आणि निष्पक्षततेसाठी भारत सर्व सदस्य देशांबरोबर काम करेल. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com