भारताने माझा वापर कधीही केलेला नाही: दलाई लामा

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

चीनमधील काही संकुचित मनाच्या राजकीय नेत्यांनी भारताविषयी चुकीची प्रतिमा तयार केली आहे. मीदेखील राक्षस असल्याची त्यांची धारणा आहे. मात्र वस्तुस्थिती अर्थातच तशी नाही...

बोमडिला - तिबेटचे श्रद्धास्थान असलेल्या दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यामुळे चीनचा संताप अनावर झाला असून लामा यांचा भारत चीनविरोधात वापर करुन घेत असल्याची टीका सरकारी चिनी माध्यमांमधून करण्यात आली आहे. मात्र चीनचा हा आरोप दलाई लामा यांनी आज (बुधवार) फेटाळून लावला.

भारताकडून चीनविरोधात माझा वापर कधीही करण्यात आलेला नाही, अशी स्पष्टोक्ती दलाई लामा यांनी केली. याचबरोबर, चीन व तिबेटच्या भल्यासाठी चीनने तिबेटला "अर्थपूर्ण स्वायत्तता' द्यावी, असे आवाहनही दलाई लामा यांनी केले.

""चीनमध्ये भारताविषयी प्रेम असलेले अनेक नागरिक आहेत. मात्र चीनमधील काही संकुचित मनाच्या राजकीय नेत्यांनी भारताविषयी चुकीची प्रतिमा तयार केली आहे. मीदेखील राक्षस असल्याची त्यांची धारणा आहे. मात्र वस्तुस्थिती अर्थातच तशी नाही. आम्हला तिबेटचे स्वातंत्र्य नको आहे. आम्हाला चीनबरोबर रहायची इच्छा आहे. तिबेट हा आर्थिकदृष्टया मागास असला; तरी अध्यात्मामध्ये अत्यंत प्रगत आहे. आम्हाला चीनबरोबर राहून आमची प्रगती साधावयाची आहे. अर्थात तिबेट व चीनच्या विकासाकरिता चीनहीही अशी भूमिका असणे महत्त्वाचे आहे,'' अशी प्रतिक्रिया दलाई लामा यांनी बोमडिला येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: India has never used me against China: Dalai Lama