भारत व्हिएतनामला "आकाश' देणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

चीनकडून सातत्याने भारताची अडवणूक करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. तेव्हा भारताकडूनही चीनला व्हिएतनाम व जपानशी लष्करी संबंध अधिक बळकट करण्याच्या कृतीमधून प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचे मानले जात आहे.

नवी दिल्ली - "आकाश' या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची विक्री व्हिएतनामला करण्यासंदर्भात भारताने उत्सुकता दर्शविली आहे.

आशिया-प्रशांत महासागर भागामधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर भारत व व्हिएतनाममधील सबंधही हळुहळू दृढमूल होऊ लागल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. विशेषत: गेल्या काही महिन्यांत दिसून आलेल्या चीनच्या अडवणुकीच्या धोरणाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे व्हिएतनामसंदर्भातील धोरण अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

आण्विक पुरवठादार गटाचे सदस्यत्व असो, वा जैश-इ-मुहम्मद या दहशतवादी गटाचा म्होरक्‍या मसूद अझर याला संयुक्त राष्ट्रसंघाकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंदर्भातील प्रयत्न असोत; चीनकडून सातत्याने भारताची अडवणूक करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. तेव्हा भारताकडूनही चीनला व्हिएतनाम व जपानशी लष्करी संबंध अधिक बळकट करण्याच्या कृतीमधून प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचे मानले जात आहे.

भारताकडून व्हिएतनामला याआधी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे व "वरुणास्त्र' हे पाणबुडीविरोधी पाणतीर (टॉर्पेडो) देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. आता भारत व्हिएतनामला आकाश क्षेपणास्त्रांची विक्री करण्याचीही दाट शक्‍यता आहे. 25 किमी पल्ला असलेले हे क्षेपणास्त्र विमान, हेलिकॉप्टर्स वा ड्रोन्सचा वेध घेऊ शकते.

दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या दांडगाईचा सामना करत असलेल्या व्हिएतनामच्या वैमानिकांस या वर्षापासून भारत प्रशिक्षणही देणार आहे. व्हिएतनाम हा भारताचा "जवळचा मित्र' असून नजीकच्या भविष्यात व्हिएतनामला लष्करीदृष्टया अधिक बळकट करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे विधान संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.

Web Title: India offers Akash surface-to-air missile systems to Vietnam