...त्यापेक्षा भारताने विकासावर लक्ष केंद्रित करावे: चीन

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

भारतास विमानवाहु नौका बांधण्याची बहुधा जास्तच घाई झाली आहे. हिंदी महासागरामधील चीनचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता विमानवाहु नौका बांधण्याच्या मोहिमेस गती देण्यापेक्षा भारताने आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावयास हवे...

बीजिंग - हिंदी महासागरामधील चीनच्या प्रभावास चाप लावण्याकरता विमानवाहु नौका बांधण्याच्या प्रक्रियेस गती देण्यापेक्षा भारताने आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावे, असा शहाजोगपणाचा सल्ला चिनी माध्यमांमधून देण्यात आला आहे.

"भारतास विमानवाहु नौका बांधण्याची बहुधा जास्तच घाई झाली आहे. भारत अद्यापी औद्योगिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्येच आहे. अशा वेळी विमानवाहु नौका बांधण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येऊ शकतात. गेल्या काही दशकांत भारत व चीन या दोन्ही देशांनी विमानवाहु नौका बांधण्यासंदर्भात दोन वेगवेगळे मार्ग स्वीकारले. मात्र दोन्ही देशांच्या प्रगतीमधील फरकामधून आर्थिक विकासाचे महत्व स्पष्ट होते. तेव्हा हिंदी महासागरामधील चीनचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता विमानवाहु नौका बांधण्याच्या मोहिमेस गती देण्यापेक्षा भारताने आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावयास हवे. जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनकडे आता व्यूहात्मक हिताच्या संरक्षणासाठी बलिष्ठ नौदल बांधण्याची क्षमता आहे. चीनकडून निर्मिती करण्यात आलेली पहिली विमानवाहु नौका हे चीनच्या आर्थिक विकासाचे फळ आहे. आशिया-प्रशांत व हिंदी महासागरामध्ये प्रभाव वाढविण्यासाठीच्या शस्त्रनिर्मिती शर्यतीमध्ये (आर्म्स रेस) सहभागी होण्याची इच्छा असती; तर चीनने काही वर्षांपूर्वीच या विमानवाहु नौकेची बांधणी पूर्ण केली असती,'' असा सल्ला ग्लोबल टाईम्स या चीनमधील सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमामधून देण्यात आला आहे.

याचबरोबर, विमानवाहु नौकेच्या बांधणीसंदर्भातील नकारात्मक उदाहरण म्हणून भारताकडे पहावयास हरकत नाही, अशी उपाहासात्मक टीकाही चीनने भारतावर केली आहे.

Web Title: India should focus more on economic development, says China