दलाई लामांच्या अरुणाचल भेटीवरून चीनची आगपाखड

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

तिबेटप्रकरणी आपली भूमिका भारताने कायम ठेवावी अशी आम्ही सूचना करतो. तसेच, चीनच्या हितांच्या विरोधात दलाई लामा यांचा वापर भारताने करू नये. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करणे आवश्‍यक आहे

बीजिंग - तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या भेटीमुळे भारत- चीन संबंध आणि सीमाप्रश्नावर नकारात्मक परिणाम झाला असल्याचे आज पुन्हा एकदा चीनने म्हटले आहे. तसेच, चीनच्या हितांच्या विरोधात दलाई लामा यांचा वापर करू नये, असा सल्लाही चीनने भारताला दिला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग म्हणाले, की दलाई लामा यांच्या अरुणाचलच्या भेटीमुळे भारत-चीन संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. अशा घटनांमुळे द्विपक्षीय संबंधांना फटका बसत असून, त्यामुळे सीमाप्रश्नावरही परिणाम होत आहे.

दलाई लामा यांच्या अरुणाचलच्या भेटीवरून भारताने आपली भूमिका स्पष्ट केली असून, तिबेट हा चीनचा भाग असल्याच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही, असे भारतातर्फे सांगण्यात आले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कांग म्हणाले, की तिबेटप्रकरणी आपली भूमिका भारताने कायम ठेवावी अशी आम्ही सूचना करतो. तसेच, चीनच्या हितांच्या विरोधात दलाई लामा यांचा वापर भारताने करू नये. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करणे आवश्‍यक आहे.

Web Title: India shouldn’t undermine China's interests by using Dalai Lama, says Beijing