भारताचा आर्थिक विकास झपाट्याने होणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

भारतामध्ये 1 जुलैपासून जीएसटी लागू होत आहे, या पार्श्‍वभूमीवर जीएसटीमुळे भारताला लाभ होणार असून, जागतिक बाजारातील पतही वाढणार असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे...

वॉशिंग्टन - चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा आर्थिक विकास झपाट्याने होणार असल्याचा अंदाज जागतिक बॅंकेने व्यक्त केला आहे. नोटाबंदीच्या प्रतिकूल परिणामांनंतर भारताची आर्थव्यवस्था रुळावर आली असून वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीने विकासवृद्धीचा वेग आणखी वाढणार असल्याचे जागतिक बॅंकेचे म्हणणे आहे.

जीएसटीसारख्या आर्थिक सुधारणांमुळे स्थानिक बाजारातील मागणी वाढणार असून, त्याचा अर्थव्यवस्थेला थेट फायदा होणार आहे. भारताचा 2016 या वर्षातील विकासदर 6.8 टक्के होता. तो 2017 मध्ये 7.2 टक्‍क्‍यांवर गेला. एकूणच आर्थिक सुधारणांची स्थिती पाहता भारत सर्वाधिक गतीने आर्थिक विकास करणार देश राहणार असल्याचेही जागतिक बॅंकेचे म्हणणे आहे. जागतिक बॅंकेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास अंदाज जानेवारीच्या तुलनेत 0.4 टक्के बेसिक पॉइंट्‌सने वाढला असल्याचे नमूद केले आहे.

एकीकडे भारताचा आर्थिक विकास वेगाने होत असताना चीनची अर्थव्यवस्था मात्र सुस्तावणार असल्याचे जागतिक बॅंकेचे म्हणणे आहे. चीनच्या आर्थिक विकासाच्या अंदाजामध्ये कोणताही बदल आढळून येत नसून, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने ही धोक्‍याची घंटा असल्याचे जागतिक बॅंकेचे म्हणणे आहे. 2018 व 2019 या आर्थिक वर्षांमध्ये चीनचा विकास 6.3 टक्‍क्‍यांनी होणार असल्याचा जागतिक बॅंकेचा अंदाज आहे.

भारताचा 2019 पर्यंतचा विकास 7.5 टक्के दराने होणार असल्याचे जागतिक बॅंकेचे म्हणणे आहे. नोटाबंदीमुळे चलनतुटवड्याला सामोरे जावे लागल्यानंतर आता पुन्हा अर्थव्यवस्थेने उभारी घेतली आहे. चलनतुटवड्याची समस्या कमी झाली असून, बॅंकांमध्येही विविध कायद्यांमुळे सुधारणांचे वारे वाहू लागले आहे. या स्थितीत भारताच्या महसूल विभागाची कामगिरीही लक्षणीय असून, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होत असल्याचे जागतिक बॅंकेचे म्हणणे आहे.

जीएसटीचा लाभ होणार
भारतामध्ये 1 जुलैपासून जीएसटी लागू होत आहे, या पार्श्‍वभूमीवर जीएसटीमुळे भारताला लाभ होणार असून, जागतिक बाजारातील पतही वाढणार असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. जीएसटीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारताने कंबर कसली असून, जीएसटी परिषदेकडून विविध वस्तूंचे दरही ठरविण्यात आले आहेत.

Web Title: India to witness rapid growth