बहुप्रतिक्षित 'रॅफेल विमाने करार' अखेर यशस्वी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016

या 36 विमानांसाठीच्या सहाय्यक युद्धसामग्रीचा खर्च 180 कोटी युरो इतका आहे; तर विमानाच्या कामगिरीवर अवलंबून असलेल्या साहित्याचा खर्च आणखी 35.3 कोटी युरो इतका असणार आहे. 

नवी दिल्ली - भारत व फ्रान्सने आज (शुक्रवार) अत्याधुनिक क्षेपणास्त्रे व युद्धसामग्रीने सुसज्ज असलेली 36 रॅफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंदर्भातील 7.87 अब्ज युरो किंमतीच्या करारावर स्वाक्षरी केली. या लढाऊ विमानांच्या अंतर्भावामुळे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य अधिक वाढणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व फ्रान्सचे संरक्षण मंत्री जेन य्वेस ले द्रायन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. 

फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 36 रॅफेल विमानांच्या खरेदीसंदर्भातील दिलेल्या आश्‍वासनानंतर 16 महिन्यांनी हा करार करण्यात आला आहे. यासंदर्भातील आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने तयार केलेला प्रस्ताव धुडकावून लावत सध्याच्या सरकारने फ्रान्सशी नव्याने बोलणी सुरु केली होती. किंमतीसंदर्भात घेण्यात आलेल्या नव्या भूमिकेनंतर करण्यात आलेल्या या करारामुळे भारतास तब्बल सुमारे 75 कोटी युरो वाचविणे शक्‍य होणार आहे. याशिवाय, या करारामध्ये ‘50% ऑफसेट‘ कलमही समाविष्ट करण्यात आले आहे. या कलमामुळे भारतामधील छोट्या व मोठ्या कंपन्यांना या कराराच्या माध्यमामधून तब्बल 3 अब्ज युरो किंमतीचे काम मिळणार आहे. 

या करारानंतर 36 महिन्यांमध्ये या विमानांच्या हवाई दलामधील समावेशाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. याचबरोबर ही प्रक्रिया 66 महिन्यांच्या आतमध्ये पूर्ण होईल. रॅफेल विमानाच्या शस्त्रसाठ्यामध्ये समावेश असलेल्या स्काल्प, मेटेओर यांसारख्या क्षेपणास्त्रांमुळे भारतीय हवाई दलाची मारक क्षमता अधिक प्रभावी होणार आहे. 

हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या मेटेओर क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे 150 किमी (बियॉंड व्हिज्युअल रेंज- बीव्हीआर) इतका आहे. यामुळे, भारतीय हद्दीत राहून पाकिस्तानच्या भूमीत प्रभावी हल्ला करण्याची क्षमता भारतीय हवाई दलास प्राप्त होणार आहे. पाकिस्तानकडे सध्या 80 किमी बीव्हीआर मारक क्षमता असलेली विमाने आहेत. याआधी कारगिल युद्धामध्ये भारताने 50 किमी बीव्हीआर पल्ला असलेल्या विमानांचा वापर केला होता. यानंतर पाककडून या प्रकारच्या विमानांची खरेदी करण्यात आली होती. याचबरोबर, स्काल्प या हवेमधून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा पल्ला 300 किमींपेक्षा जास्त आहे.

Web Title: India,France sign deal for 36 Rafale Fighters