सिक्कीम: चीनने उध्वस्त केला भारतीय लष्कराचा बंकर

पीटीआय
बुधवार, 28 जून 2017

चीनमध्ये एकूण 3,488 किमी लांबीची सीमारेषा असून त्यामधील 220 किमी लांबीची सीमारेषा सिक्कीम भागामध्ये येते. याआधी, सिक्कीम येथे नोव्हेंबर 2008 मध्ये चीनकडून घुसखोरी करण्यात आली होती. यावेळीही भारतीय लष्कराचे काही बंकर्स चीनकडून उध्वस्त करण्यात आले होते

नवी दिल्ली - सिक्‍कीम भागामधील भारतीय लष्कराचा जुना बंकर चिनी सैन्याने बुलडोझरच्या सहाय्याने उध्वस्त केला आहे. हा बंकर हटविण्यासंदर्भात चीनकडून करण्यात आलेली विनंती भारताकडून फेटाळण्यात आल्यानंतर चीनकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सिक्‍कीममधील दोका ला येथे भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर भारताकडूनच चिनी हद्दीमधील काम रोखण्यात आल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता.

भारतीय लष्कराकडून सिक्कीम भागामधील जुन्या बंकर्सच्या डागडुजीसहित येथे अधिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लष्कराच्या या कार्यामुळे चीन संतप्त झाल्याचे मानले जात आहे. भारत व चीनमध्ये एकूण 3,488 किमी लांबीची सीमारेषा असून त्यामधील 220 किमी लांबीची सीमारेषा सिक्कीम भागामध्ये येते. याआधी, सिक्कीम येथे नोव्हेंबर 2008 मध्ये चीनकडून घुसखोरी करण्यात आली होती. यावेळीही भारतीय लष्कराचे काही बंकर्स चीनकडून उध्वस्त करण्यात आले होते.

"सीमावादामध्ये चीनच्या विरोधात उभे राहणे भारताला परवडणारे नाही. सीमावादाचा भडका उडू देणे चीनने आत्तापर्यंत टाळले आहे. यावेळी मात्र भारताला नियम शिकविणे आवश्‍यक आहे,'' असा इशारा ग्लोबल टाईम्स या चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधील एका लेखाच्या माध्यमाधून देण्यात आला आहे.

तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश दौरा, भारताशी अमेरिकेशी वाढणारी जवळिक, अफगाणिस्तानमध्ये भारताचा वाढणारा प्रभाव, अशा इतर कारणांमुळे चीनकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. ग्लोबल टाईम्स या चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधून या विषयांसंदर्भात वेळोवेळी भारतावर टीका करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता भारताच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Indian bunker in Sikkim removed by China