भारताच्या संस्कृतीचे सिडनीत दर्शन

वाणिज्य दूतावासातर्फे नृत्य, योगविद्या अन फॅशन शोचे आयोजन
Indian culture in Sydney Consulate General India
Indian culture in Sydney Consulate General Indiasakal

सिडनी : सिडनीतील पॉवरहाऊस म्युझियममध्ये भारतीय संस्कृती व फॅशनचा मिलाप दिसून आला. शास्त्रीय नृत्यातील नजाकत ते तालवाद्यांचे फ्युजन, बॉलिवूडमधील ठेका धरायला लावणारे संगीत ते योगविद्या अशा विविधतेमुळे भारतीय वाणिज्य दूतावासाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने सायंकाळ अविस्मरणीय ठरली.‘धरोहर’अंतर्गत फॅशन शोमध्ये भारतीय वस्त्रोद्योगाच्या समृद्ध वारशाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांपैकी न्यू साऊथ वेल्सच्या माजी मंत्री व विरोधी पक्षनेत्या जोडी मॅकके या खास भारतीय पेहरावात म्हणजे साडी नेसून आल्या होत्या.

माजी वाणिज्य, गुंतवणूक व पर्यटन मंत्री अँड्र्यू रॉब यांच्यासह विविध शहरांचे महापौर, अध्यक्ष, कला, संस्कृती, शिक्षण, उद्योग, सामाजिक क्षेत्र व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी खास निमंत्रित होते. वाणिज्य दूत मनीष गुप्ता यांनी स्वागतपर भाषणात भारतातील सांस्कृतिक विविधतेच्या समृद्ध परंपरेचे महत्त्व स्पष्ट करीत ऑस्ट्रेलियन समाजाच्या बहुसांस्कृतिक दृष्टिकोनाची प्रशंसा केली. मॅकके यांनी ऑस्ट्रेलिया दरम्यान सांस्कृतिक पूल बांधण्यासाठी वाणिज्य दूतावासाने केलेल्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले.

शिवगर्जना ढोल-ताशाच्या गर्जनेने या रंगारंग कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ‘सिडनी कंझर्व्हेटरियम’मधील वरिष्ठ तज्ज्ञांसह येथील सिडनीतील प्रसिद्ध तबलावादक व त्यांच्या चमूने सादर केलेल्या राग पूरिया धनश्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. अमित शर्मा आणि धम्म योगा’च्या समर्पित स्वयंसेवकांनी सादर केलेल्या योग मुद्रा आणि रचनांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. ‘संवाद’ या नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित भरतनाट्य, कथक व ओडिसी या परंपरागत शास्त्रीय नृत्याचे सुंदर सादरीकरण मंजुळा विश्‍वनाथ, साक्षी कुमार आणि नवनीता बॅनर्जी यांनी त्यांच्या शिष्यांच्या साथीने केले. बॉलिवूड व गुजराती लोकनृत्याने उपस्थितांना ठेका धरायला लावला होता. याचे नृत्यदिग्दर्शन जुही भावसार यांनी केले होते.

भारतीय धाग्यांची गुंफण

प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाचे आकर्षण हे फॅशन शो ठरले. ‘धरोहर- युनायटेड थ्रेड्स ऑफ इंडिया’ (भारतीय धाग्यांची गुंफण) ही कल्पना त्यामागे होती. भारतीय वस्त्रांची अभिजातता, उत्कृष्टता आणि कारागिरीचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. भारतातील विविध राज्यांची ओळख असलेल्याअद्वितीय आणि वैशिष्टपूर्ण पेहरावांचे सादरीकरण ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय समुदायाने उत्कृष्टपणे केले. त्याचप्रमाणे नुकताच साजरा झालेली होळी, आगामी नवरोजचा सण यांचे महत्त्व ‘सबटल एनर्जीज’च्या फरिदा इराणी यांनी विशद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com