'माझ्या देशातून निघून जा' म्हणत भारतीय तरुणाची अमेरिकेत हत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन : श्रीनिवास कुचिभोतला (वय 32) या भारतीय अभियंत्याची अमेरिकेतील केन्सास येथे गोळी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दु:ख व्यक्त केले असून शोकाकुल कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

अमेरिकेन लष्करातून निवृत्त झालेल्या आदम पुरिनतॉन या 51 वर्षाच्या व्यक्तीने बुधवारी रात्री "माझ्या देशातून निघून जा' असे म्हणत श्रीनिवाससह अन्य काही जणांवर गोळीबार केला. या घटनेनंतर श्रीनिवास आणि त्याचा एक सहकारी आलोक मादासानी जखमी झाले. मात्र, स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असताना श्रीनिवासचा मृत्यू झाला. आदमने हल्ला करण्यापूर्वी वंशभेदासंदर्भातील काही टिपणीही केली, अशी माहिती घटनेच्या एका साक्षीदाराने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आदमला ताब्यात घेतले आहे.

ही घटना ऐकून धक्का बसल्याच्या प्रतिक्रिया स्वराज यांनी व्यक्त केल्या. त्यांनी ट्विटरद्वारे लिहिले आहे की, "श्रीनिवास कुचिभोतलाची केन्सास येथे हत्या झाल्याचे ऐकून मला धक्का बसला. मी शोकाकुल कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. मी अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेज सरना यांच्याशी चर्चा केली आहे. भारतीय दूतावासातील दोन अधिकारी केन्सासमध्ये दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जखमी झालेल्या आलोकला रुग्णालयात घरी सोडण्यात आले आहे. शोकाकुल कुटुंबियांनी आम्ही आवश्‍यक मदत पुरविणार आहोत. मी श्रीनिवासचे हैद्राबादमधील बंधू केके शास्त्री यांच्याशी चर्चा केली आहे. श्रीनिवासचा मृतदेह हैद्राबादला आणण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची तयारी करत आहोत.'

Web Title: Indian engineer murder in Cansas America