भारतीय राजदूत पाक परराष्ट्र सचिवांच्या भेटीस...

पीटीआय
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

जाधव यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासंदर्भात भारताकडून करण्यात आलेली राजनैतिक विनंती पाकिस्तानकडून तब्बल 13 वेळा फेटाळण्यात आली होती. भारतीय राजदूत व पाकिस्तानी परराष्ट्र सचिवांच्या प्रस्तावित चर्चेमध्ये हा मुद्दा अत्यंत संवेदनशील ठरण्याची शक्‍यता आहे

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने फाशी सुनाविलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकासंदर्भात चर्चा करण्यासाठी भारताचे पाकिस्तानमधील राजदूत गौतम बंबावले पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जंजुआ यांची भेट घेणार आहेत. जाधव यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासंदर्भात भारताकडून करण्यात आलेली राजनैतिक विनंती पाकिस्तानकडून तब्बल 13 वेळा फेटाळण्यात आली होती. भारतीय राजदूत व पाकिस्तानी परराष्ट्र सचिवांच्या प्रस्तावित चर्चेमध्ये हा मुद्दा अत्यंत संवेदनशील ठरण्याची शक्‍यता आहे.

राजनैतिक प्रयत्नांबरोबरच जाधव यांना कायदेशीर मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्नही भारताकडून करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जाधव यांची काहीही माहिती नसल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून काल (गुरुवार) स्पष्ट करण्यात आले होते. "अपहृत' जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारताकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जाधव यांनी भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून त्यांना पाकिस्तानातील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, जाधव यांनी पाकिस्तानमध्ये कोणतेही गैरकृत्य केल्याचा एकही पुरावा नाही. त्यामुळे जाधव यांची पाकिस्तानकडून पूर्वनियोजित हत्या होत असल्याची भूमिका भारताने व्यक्त केली आहे. 

 

Web Title: Indian envoy to meet Pakistan's foreign secretary