अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी आढळला दोषी

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

सिंग याने परदेशात (भारतात) हिंसाचार व अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशार्थ कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना मदत केली. आंतरराष्ट्रीय दहशतवादास हातभार लावणाऱ्या नागरिकांस हुडकून काढून शासन करणे, हा न्याय विभागाच्या प्राधान्यक्रमावरील विषय आहे

रेनो - भारतामध्ये दहशतवादी हल्ला घडविण्याबरोबरच देशातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या हत्या घडविण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये अमेरिकेमधील एक 42 वर्षीय भारतीय नागरिक दोषी आढळला आहे.

स्वतंत्र शिख देश निर्माण करण्याच्या उद्दिष्टार्थ सुरु करण्यात आलेल्या खलिस्तान चळवळीमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना मदत करण्यासंदर्भातील आरोपही बलविंदर सिंग याच्याविरोधात ठेवण्यात आला होता. सिंग हा नेवाडामधील रहिवासी आहे.

"सिंग याने परदेशात (भारतात) हिंसाचार व अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशार्थ कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना मदत केली. आंतरराष्ट्रीय दहशतवादास हातभार लावणाऱ्या नागरिकांस हुडकून काढून शासन करणे, हा न्याय विभागाच्या प्राधान्यक्रमावरील विषय आहे,'' असे येथील अतिरिक्त "ऍटर्नी जनरल' मेरी मॅककॉर्ड यांनी म्हटले आहे.

भारत व अमेरिकेमधील कायमस्वरुपी नागरिकत्व असलेल्या सिंग याला झाजी, हॅपी आणि बलजित सिंग अशा नावांनीही ओळखले जात होते. सिंग याला डिसेंबर 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. सिंग याला आता जास्तीत जास्त 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविली जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Indian man in US pleads guilty to conspiracy for attacks in Punjab