साक्षी, दीपा, अलिया आशियातील "सुपर ऍचिव्हर' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, ऑलिंपिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक आणि अभिनेत्री अलिया भट यांचा "फोर्ब्ज'ने तयार केलेल्या आशियातील "सुपर ऍचिव्हर'च्या यादीत समावेश केला आहे. या यादीमध्ये तिशीच्या आतील व्यक्तींचा समावेश आहे. 

न्यूयॉर्क : जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, ऑलिंपिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक आणि अभिनेत्री अलिया भट यांचा "फोर्ब्ज'ने तयार केलेल्या आशियातील "सुपर ऍचिव्हर'च्या यादीत समावेश केला आहे. या यादीमध्ये तिशीच्या आतील व्यक्तींचा समावेश आहे. 

"फोर्ब्ज'ने मनोरंजन, क्रीडा, अर्थकारण, सामाजिक, तंत्रज्ञान अशा दहा विविध क्षेत्रांमधील प्रत्येकी तीस तरुण व्यक्तींना या यादीत स्थान दिले आहे. तीनशे जणांच्या या यादीत भारतातील 53 जणांचा, तर चीनमधील 76 जणांचा समावेश आहे. गेल्या वर्षी रिओ डी जानेरो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या दीपा कर्माकर (वय 23) हिने यादीत स्थान मिळविले आहे. तिला पदक मिळाले नसले तरी ती चांगली कामगिरी बजावत चौथा क्रमांक पटकाविला होता. तसेच, 52 वर्षांनंतर भारतातर्फे स्पर्धेत प्रवेश मिळालेली ती पहिली जिम्नॅस्ट होती. याच स्पर्धेत कुस्ती प्रकारात साक्षी मलिकने (वय 24) ब्रांझ पदक पटकाविले होते.

ऑलिंपिकमध्ये पदक मिळविणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. तिच्या या कामगिरीची दखल "फोर्ब्ज'ने घेतली आहे. अलिया भट (वय 24) हिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कमी वयातच अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका करत भारतीय चित्रपट रसिक आणि समीक्षकांचीही वाहवा मिळविली आहे. तिच्या चित्रपटांनी तिकीटबारीवरही चांगली कमाई केली आहे. तिच्या यशाचीही दखल "फोर्ब्ज'ने घेतली आहे. 

इतर भारतीय 
ऊर्जा क्षेत्रातील बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोल्ला (वय 25) यांचा यादीत समावेश आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबामधील श्रीकांत हे जन्मांध आहेत. जिद्दीने व्यवस्थापन क्षेत्रात पदवी घेत "एमआयटी'मध्ये शिक्षण घेणारे पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंध विद्यार्थी म्हणून स्वत:च्या नावाची नोंद केली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचारांविरोधात आवाज उठविणाऱ्या त्रिशा शेट्टी (वय 26) यांचाही यादीत समावेश आहे. यादीतील भारतीय व्यक्तींमध्ये संजयकुमार (वय 15) आणि श्रवणकुमार (वय 17) या भावांचा समावेश आहे. त्यांनी मोबाईल ऍप विकसित करणाऱ्या कंपनीची स्थापना केली आहे. 

Web Title: Indian names in Forbes List