पाकविरोधी कारवायांत भारतीय अधिकाऱ्यांचा हात

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आठ जणांवर आरोप
इस्लामाबाद - भारतीय उच्चायुक्तालयातील आठ अधिकारी भारताच्या गुप्तचर संस्थांचे सदस्य असून, ते येथील घातपाती कृत्यांमध्ये गुंतल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. हेरगिरीप्रकरणी भारताने पाकिस्तानी अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्याने नाचक्की झालेल्या पाकिस्तानने आता उलट्या बोंबा मारण्यास सुरवात केली आहे. या कारवाईला उत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानने चालविल्याचे यातून स्पष्ट होते. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढणार आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी आज पत्रकार परिषदेत हा आरोप केला. ते म्हणाले, 'भारतीय उच्चायुक्तालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी पाकिस्तानात दहशतवाद्यांचे जाळे तयार करण्यात, तसेच घातपाती कारवायांत गुंतले आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या नावाने ते येथे रहात असून अशा कारवाया करीत आहेत.''

"रॉ'चे केंद्रप्रमुख अनुराग सिंह, वाणिज्य सचिव राजेश कुमार अग्निहोत्री, अरमसिंग भट्टी, व्हिसाविषयक अधिकारी धर्मेंद्र सोधी, कर्मचारी विजयकुमार वर्मा, माधवन नंदा कुमार, बलबीर सिंग, जयबलान सेंथील अशी त्यांची नावे असल्याचे झकेरिया यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी सुरजित सिंग यांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले होते, तेदेखील "आयबी'साठी काम करीत होते. एका टेलिकॉम कंपनीसाठी ते काम करीत असल्याचे सिंग भासवत होते.''

हेरगिरीप्रकरणी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी मेहमूद अख्तर यांची हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तानने सुरजित सिंग यांना देश सोडण्यास सांगितले होते.

झकेरिया म्हणाले, 'पाकिस्तानात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचप्रमाणे दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविण्यासाठी भारत मदत करीत असल्याचे कुलभूषण जाधव याने यापूर्वीच सांगितले होते. उच्चायुक्त कार्यालयाचाही भारत अशा कारवायांसाठी उपयोग करतो हे दुर्दैवी आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील दहशतवादी कृत्यांना उच्चायुक्तालयातील अधिकारी खतपाणी घालत आहेत. प्रामुख्याने कराचीतील कारवायांमध्ये ते गुंतले आहेत. चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी बलुचिस्तान व सिंध प्रांतात अस्थिरतावाढीसाठी ते प्रयत्न करीत आहेत. पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील संबंध खराब व्हावेत यासाठीही हे अधिकारी प्रयत्नशील आहेत. अशी कृत्ये करून भारताने राजनैतिक संकेतांचे उल्लंघन केले आहे. भारताने सहा पाकिस्तानी अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक हकालपट्टी केली आहे.''

Web Title: Indian officers involve in pakistan oppose activities