अमेरिकेत भारतीयांचे राजकारण

indian-politics
indian-politics

वॉशिंग्टन - जगातील महासत्तेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचे हिलरी क्‍लिंटन यांचे स्वप्न धुळीला मिळाले असले, तरी अमेरिकेची यंदाची सार्वत्रिक निवडणूक भारतीयांच्या दृष्टीने लाभदायी ठरली आहे. निवडणुकीत भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक कमला हॅरिस यांची सिनेटच्या सदस्यपदी निवड झाली आहे. सिनेटमध्ये निवडून येणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या असून, त्यांच्या या विजयाने इतिहास रचला आहे. तसेच भारतीय वंशाचे अन्य तीन जण ‘हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मध्ये (प्रतिनिधीगृह) निवडून आले आहेत तर अमी बेरा यांच्या यांच्या मतांची फेरमतमोजणी सुरू झाली आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस (वय ५१) यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अन्य उमेदवार लोरेटा सॅंचेझ यांचा ३४.८ टक्के मतांनी पराभव केला. हॅरिस यांना एकूण १९,०४,७१४ मते मिळाली. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा व उपाध्यक्ष जो बिडेन यांनी हॅरिस यांना पाठिंबा दर्शविला होता. कॅलिफोर्नियातील राज्याच्या ॲटर्नी जनरलपदी त्या दोन वेळा निवडून आल्या आहेत.

प्रतिनिधीगृहात प्रमिला जयपाल
अन्य एक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक प्रमिला जयपाल (वय ५१) या वॉशिंग्टन राज्याच्या प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीगृहात प्रवेश करणार आहेत. या पदापर्यंत प्रथमच पोचलेल्या त्या पहिला भारतीय वंशाच्या महिला आहेत. त्यांचा जन्म चेन्नईत झाला असून, वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी भारत सोडला. त्या प्रथम इंडोनेशिया, सिंगापूर व शेवटी अमेरिकेत स्थायिक झाल्या. २५ वर्षांच्या कालावधीनंतर एप्रिल १९९५ मध्ये त्यांनी भारताला भेट दिली होती. ‘पिलग्रिमेज टू इंडिया ः ए वुमन रिव्हिजिट्‌स हर होमलॅंड’ हे त्यांचे पुस्तकही २०००मध्ये प्रसिद्ध झाले आहे. 

राजा कृष्णमूर्तींचे यश
राजा कृष्णमूर्ती (वय ४३) यांनी इलिनॉयमधून विजय मिळवित प्रतिनिधीगृहाची वाट धरली. एल्मरस्टचे माजी महापौर पीटर डिकीन्नी यांचा त्यांनी पराभव केला. प्रतिनिधीगृहावर निवड झालेले ते दुसरे हिंदू-अमेरिकन ठरले आहेत. त्यांचा जन्म नवी दिल्लीत झाला असून, मूळ गाव चेन्नई आहे. दुसऱ्या प्रयत्नांत त्यांना हे यश मिळाले आहे.

अमी बेरा विजयपथावर
प्रतिनिधीगृहासाठी कॅलिफोर्नियाच्या जागेसाठी लढत देणारे रो खन्ना व अमी बेरा हे त्यांच्या प्रतिस्पर्धकांच्या पुढे होते. सिलिकॉन व्हॅलीतील ५६ टक्के मतांची मोजणी झाली त्या वेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे बेरा यांनी ४७ हजार ४२७ मते मिळवित (५४ टक्के मते) आघाडी घेतली होती. त्यांचे विरोधक रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्कॉट जोन्स यांना ४६ टक्के मते मिळाली होती. मात्र बेरा यांच्या मतांची फेरमोजणी सुरू झाली आहे. बेरा विजयी झाले तर प्रतिनिधीगृहातील ही त्यांची तिसरी वेळ ठरेल. तसेच या पदावर प्रदीर्घ काळ राहिलेले पहिले भारतीय वंशाचे सदस्य ठरतील.

रो खन्नांचा विजय निश्‍चित
रो खन्ना यांनी कॅलिफोर्नियाच्या १७ व्या राज्यातून  डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढविली. ७२ टक्के मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ५० हजार ९५२ मते मिळवून त्यांनी ५८ टक्‍क्‍यांनी आघाडी घेतली आहे. अखेर शेवटच्या टप्प्यात खन्ना यांनी १९ टक्के जादा मते घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी माईक होंडा यांच्यावर मात केली. होंडा हेही डेमोक्रॅटिक पक्षाचेच आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हॅरिस, कृष्णमूर्ती व बेरा यांना पाठिंबा दिला होता. सिनेटर बर्नी सॅंडर्स व अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांनी जयपाल यांची बाजू उचलून धरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com