भारतानेच केली घुसखोरी; सिक्कीममधील सैन्य मागे घ्या: चीनचा कांगावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

भारताच्या स्वातंत्र्यानंतर सिक्कीम येथील सीमारेषेसंदर्भात कोणताही आक्षेप नसल्याचे भारतामधील सरकारकडून अनेक वेळा लेखी स्वरुपात स्पष्ट करण्यात आले आहे. या भागामध्ये रस्ता बांधणे हा चीनचा सर्वभौम हक्क असून त्यास आक्षेप घेण्याचा भारतास कोणताही अधिकार नाही

बीजिंग - भारतीय - चीन सीमारेषेवरील सिक्कीम भागामध्ये चीनच्या सार्वभौम हद्दीमधील रस्त्याचे बांधकाम करण्यापासून भारतीय लष्कराकडूनच रोखण्यात आल्याचा कांगावा चीनकडून करण्यात आला आहे.

चिनी हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या भारतीय लष्कराच्या या भूमिकेमुळे सीमारेषेवरील शांतता धोक्‍यात आल्याची टीका चीनकडून करण्यात आला आहे. चिनी हद्दीमधील कामांमध्ये भारतीय लष्कराकडून अडथळा आणला जात असल्याचा दावा करत सिक्कीम व तिबेट या भागांमधील लष्कर भारताने मागे घ्यावे, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे.

"भारत व चीनमधील सिक्कीम येथील सीमारेषा ही ऐतिहासिक करारान्वये निश्‍चित करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सिक्कीम येथील सीमारेषेसंदर्भात कोणताही आक्षेप नसल्याचे भारतामधील सरकारकडून अनेक वेळा लेखी स्वरुपात स्पष्ट करण्यात आले आहे. या भागामध्ये रस्ता बांधणे हा चीनचा सर्वभौम हक्क असून त्यास आक्षेप घेण्याचा भारतास कोणताही अधिकार नाही. भारताबरोबरील संबंध बळकट करण्याची चीनची इच्छा आहे; मात्र चीनचे अधिकार व राष्ट्रीय हितासंदर्भातही चीन कटिबद्ध आहे,'' असे निवेदन चीनकडून या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Web Title: Indian Soldiers Stopped Us From Constructing Sikkim Road, Complains China