कुचिभोतलांची हत्या लज्जास्पद:कॅन्सास गव्हर्नर

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

या हत्येमुळे लाज वाटत असून कॅन्साससारख्या भारतीयांना बहुमूल्य मानत असलेल्या राज्यासाठी ही घटना शोभनीय नसल्याची भावनाही ब्राऊनबॅक यांनी व्यक्त केली

न्यूयॉर्क - कॅन्सासमधील भारतीय समुदाय हा बहुमूल्य असून भारतीयांचे या राज्यात स्वागतच असल्याची भूमिका येथील गव्हर्नर सॅम ब्राऊनबॅक यांनी स्पष्ट केली आहे.

कॅन्सासमध्ये नुकतीच श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे लाज वाटत असून कॅन्साससारख्या भारतीयांना बहुमूल्य मानत असलेल्या राज्यासाठी ही घटना शोभनीय नसल्याची भावनाही ब्राऊनबॅक यांनी व्यक्त केली. याचबरोबर, एका व्यक्‍तीने द्वेषभावनेमधून केलेला हल्ला ही कॅन्सासची ओळख असू शकत नाही, असेही गव्हर्नर म्हणाले.

भारतीय राजनैतिक अधिकारी अनुपम रे यांनी ब्राऊनबॅक यांची नुकतीच भेट घेतली. रे यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ब्राऊनबॅक यांनी कॅन्सासमध्ये "हेट क्राईम्स'ला स्थान नसल्याचे सांगितले. ब्राऊनबॅक यांच्यासह रे यांनी येथील प्रशासनामधील अन्य उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.

याचबरोबर, कुचिभोतला यांना वाचविण्याचा प्रय्त्न करणाऱ्या इयान ग्रिलोट यांचीही रे यांनी भेट घेतली. ग्रिलोट यांच्यावरही या प्रयत्नात गोळीबार झाला होता. ग्रिलोट हेच अमेरिकेचे खरे प्रतिनिधी असल्याचे मत रे यांनी व्यक्‍त केले.

Web Title: Indians are valuable; ashamed of shooting, Kansas Governor says