सौदी अरेबियातील भारतीय ‘घरवापसी’ करणार

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

सौदी अरेबियातील बर्‍याच कुटुंबांना 'डिपेंडेंट फी'मुळे भारतात परत येण्यास भाग पडले आहे. मात्र काही कंपन्यांनी कुटुंबावर लादलेल्या 'डिपेंडेंट फी'चा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. या करांव्यतिरिक्त सौदी अरेबियात राहणाच्या खर्चात 1 जुलैपासून वाढ होणार आहे. कारण शीतपेयांच्या किमती 100 टक्क्यांनी वाढणार आहेत

रियाध: सौदी अरेबियात भारतीयांसमोर आता संकट उभे राहीले आहे. सौदी अरेबियातील सर्व भारतीयांनी आपल्या कुटुंबाला भारतात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 1 जुलैपासून सौदी अरेबियात नोकरी करणार्‍या व्यक्तीवर अवलंबुन असलेल्या म्हणजेच त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामागे त्याला 100 रियाल्स शुल्क अर्थात 'डिपेंडेंट फी' भरावी लागणार आहे. सध्या एक रियालची 17.23 रुपये किंमत आहे. म्हणजेच प्रत्येक भारतीयाला त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे 1723 रुपये प्रतिमाहिना भरावे लागणार आहेत.

सौदीच्या राजाने सौदी अरेबियात राहणार्‍या प्रत्येक परदेशी नागरिकांच्या कुटुंबियांवर हा कर लादला आहे. सौदी अरेबियात राहणार्‍या भारतीय कुटुंबांना खर्च परवडणार नसल्याने भारतीय कुटुंब आता भारतात मोठ्या संख्येने स्वदेशात येऊ लागले आहेत.

भारतीयांवर त्याचा कसा परिणाम होईल?

सौदी अरेबियातील या नव्या करामुळे सौदी अरेबियात राहणार्‍या 41 लाख भारतीयांना फटका बसणार आहे. सौदी अरेबियात सर्वाधिक भारतीय लोक वास्तव्य करतात. त्यामुळे सौदी अरेबियाने लादलेल्या नव्या कराचा भारतीयांना सर्वाधिक फटका बसणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील बर्‍याच कुटुंबांना 'डिपेंडेंट फी'मुळे भारतात परत येण्यास भाग पडले आहे. मात्र काही कंपन्यांनी कुटुंबावर लादलेल्या 'डिपेंडेंट फी'चा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. या करांव्यतिरिक्त सौदी अरेबियात राहणाच्या खर्चात 1 जुलैपासून वाढ होणार आहे. कारण शीतपेयांच्या किमती 100 टक्क्यांनी वाढणार आहेत.

सौदी अरेबियात ज्यांचे मासिक उत्पन्न ५ हजार रियाल (सुमारे ८६ हजार रुपये) आहे, त्यांना फॅमिली व्हिसा मिळतो. समजा एका कुटुंबात एक पत्नी आणि २ मुले असतील तर त्या कुटुंबप्रमुखाला ३०० रियाल म्हणजे सुमारे ५१०० रुपये दरमहिने भरावे लागणार आहेत. हा कर २०२० पर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. शिवाय हा कर आगाऊ भरावा लागणार आहे. म्हणजे जर कोणा भारतीयाची पत्नी एक वर्षासाठी सौदी अरेबियात जाऊन राहणार असेल, तर तिच्या पतीला 'इकामा' (रहिवासी परवाना) चं नूतनीकरण करताना १२०० रियाल आगाऊ भरावे लागणार आहेत. तसेच एखाद्या परिवारात ३ डिपेंडंट सदस्य असतील तर ३६०० रियाल म्हणजे ६२ हजार रुपये अॅडव्हान्स्ड द्यावे लागणार आहेत.

Web Title: Indians brace for Saudi ‘family tax’