कुलभूषण यांच्याकडून संवेदनशील माहिती: पाकचा दावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा केली जाईल; तेव्हा पाकिस्तानचीच बाजू सशक्‍त असेल. जाधव यांच्या फाशीस स्थगिती देण्याचा न्यायालयाचा निकाल हा पाकिस्तानचा पराभव वा भारताचा विजय नव्हता

इस्लामाबाद - पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याकडून पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या काही दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात "संवेदनशील माहिती' मिळत असल्याचा दावा येथील परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने एकतर्फी फाशी सुनावली होती. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यावर स्थगिती आणत पाकिस्तानला चपराक लगावली होती. यामुळे जागतिक पातळीवर पुन्हा एकदा नाचक्की झालेल्या पाकिस्तानकडून आता हा नवा दावा करण्यात आला आहे.

"जाधव यांच्याकडून पाकिस्तानमध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात संवेदनशील माहिती मिळत आहे,'' असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयामधील प्रवक्‍त्याने केला. जाधव यांच्याकडून नेमकी कोणती माहिती मिळविण्यात आली, याचा खुलासा मात्र या प्रवक्‍त्याकडून अर्थातच करण्यात आला नाही. दरम्यान, पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल अश्‍तार औसाफ यांनीही जाधव यांना "हेर' ठरविण्यासाठी पाकिस्तानकडे पुरेसा पुरावा असल्याचा दावा केला आहे.

"हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा केली जाईल; तेव्हा पाकिस्तानचीच बाजू सशक्‍त असेल. जाधव यांच्या फाशीस स्थगिती देण्याचा न्यायालयाचा निकाल हा पाकिस्तानचा पराभव वा भारताचा विजय नव्हता,'' असे "मत' औसफ यांनी यावेळी व्यक्‍त केले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीस स्थगिती दिल्यानंतर पाकच्या परराष्ट्र मंत्रालयावर देशांतर्गत संस्थांनीही टीकेची झोड उठविली होती.

निकाल विरोधात लागल्याने सर्व खापर वकिलांच्या निवडीवर फोडण्यात येत असून, यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला तज्ज्ञ आणि माध्यमांनी धारेवर धरले आहे. न्यायालयात पाकिस्तानची बाजू मांडणारे वकील खावर कुरेशी यांची निवड करण्याचा निर्णय चुकीचा होता आणि पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल यांनी दुसऱ्या वकिलांचे नाव सुचविले होते, असा दावा येथील माध्यमांनी केला आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय बंधनकारक असेल, असे पाकिस्तानने 29 मार्च 2017 ला घोषणापत्र प्रसिद्ध केले होते. त्यामुळे जाधव यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला लढविण्यापेक्षा भारताने याचिका करताच पाकिस्तानने हे घोषणापत्र मागे घेणे आवश्‍यक होते, असे मत व्यक्त होत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय न्यायालयात वाद असणाऱ्या देशांना सुनावणीवेळी आपल्या निवडीच्या एका न्यायाधीशाचे नाव सांगता येते. भारताने हे केले; पण पाकिस्तानला हे करता आले नाही. तसेच, बाजू मांडण्यासाठी मिळालेला दीड तासांचा वेळही पूर्ण वापरता आला नाही, अशी टीका माजी अतिरिक्त ऍटर्नी जनरल तारिक खोखर यांनी केली आहे

Web Title: Intelligence inputs from Kulbhushan, claims Pakistan