कतारसाठी गाईंचे 'एअर लिफ्ट'

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

दूध टंचाईवर मात करण्यासाठी व्यावसायिकाचा निर्णय
 

दोहा : कतार व शेजारील देशांमधील संघर्षाचा परिणाम राजकीय, भौगोलिक व अन्य सर्व क्षेत्रावर व्यापारावर झालेला आहे. या संघर्षामुळे या प्रदेशात दुधाचा तुटवडा जाणवत आहे, हे लक्षात घेऊन येतील एका व्यावसायिकाने चार हजार गाई विमानाने कतारला आणण्याचा निर्णय घेतला आहे. गाईंच्या 'एअर लिफ्ट'ची ही घटना इतिहासातील सर्वांत मोठी ठरणार आहे.

आपला देश कोंडीत सापडला असताना कतारमधील 'पॉवर इंटरनॅशनल होल्डिंग' या कंपनीचे अध्यक्ष मौताझ अल खय्यात यांनी तेथे गाई नेऊन देशवासीयांना दुधाचा पुरवठा सुरळीत करण्याच्या हेतूने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतून गाईंची खरेदी केली आहे. त्यांची वाहतूक करण्यासाठी 'कतार एअरवेज'ची 60 विमाने वापरण्यात येणार आहे. 'इसिस' या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देत असल्याचा आरोपावरून कतारवर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील काही देशांनी 5 जूनपासून बहिष्कार टाकला आहे. यामुळे अन्नधान्याची आयात, इमारत बांधणीचे साहित्य व तेथे असलेल्या नैसर्गिक वायूंच्या खाणींसाठीची उपकरणे यांच्या व्यापारासाठी नवीन पर्याय शोधण्याची वेळ कतारवर आली आहे.

देशातील अर्थव्यवस्थेवर बहिष्काराचा परिणाम झाला नसून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहार सुरळीत असल्याचा दावा सेंट्रल बॅंकेने केला आहे. तुर्कस्थानमधून दुग्ध उत्पादन व इराणमधून फळे व भाजीपाला येथे मोठ्या प्रमाणावर येत आहे. तसेच देशी उत्पादनांचा वापर करण्याची मोहीम येथे सुरू झाली आहे. कतारमधील सरकारी कर्मचारी उम्म इस्सा यांनी म्हटले आहे, की आम्हाला इतरांच्या मदतीची गरज नाही. देशात अजिबात टंचाई नसल्याचा दिलासा सांगून आमच्या सरकारने दिलासा दिला आहे. आम्हाला कशाचे भय नाही. देशातील एकही नागरिक उपासमारीने मरण पावणार नाही, याची खात्री आहे.

वाहतुकीसाठी 80 लाख डॉलर खर्च
कतारमध्ये दुधाची आवक सौदी आरेबियातून होते. मात्र संयुक्त अरब अमिराती व अन्य दोन देशांनी कतारशी व्यापार संबंध तोडल्यामुळे येथे दुधाची टंचाई जाणवू लागली आहे. यावर मात करण्यासाठी व कतार सरकारच्या उद्दिष्टानुसार अल खय्यात या बांधकाम व्यावसायिकाने कृषी क्षेत्रात पाऊल ठेवून व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. यासाठी त्यांनी 400 गाई विमानातून कतारला आणण्याचे नियोजन केले आहे. ''गाईंची विमानातून वाहतूक करण्यासाठीच्या खर्चात पाचपटीने वाढ होणार आहे. 80 लाख डॉलरपर्यंतचा खर्च यासाठी होणार आहे. मात्र यामुळे दैनंदिन जीवनात कोणालाही अडचणी येणार नाहीत,''असा विश्‍वास खय्यात यांनी व्यक्त केला.

Web Title: international news qatar news cow airlift milk shortage