डोनाल्ड ट्रम्प यांचा अंत लवकरच; इराणने दिली धमकी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

सुलेमानी यांच्या हत्येचा सूड रक्तपाताने घेतला जाईल आणि काही दिवसांतच या गुन्हेगाराचा खातमा केला जाईल, अशी ट्रम्प यांना जिवे मारण्याची जाहीर धमकी त्यांनी दिली आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच मृतावस्थेत आढळतील, अशी धमकी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी दोन दिवसांपूर्वी दिली आहे. इराणच्या कुड्‌स दलातील वरिष्ठ अधिकारी कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड रक्तपाताने घेतला जाईल आणि काही दिवसांतच या गुन्हेगाराचा खातमा केला जाईल, अशी ट्रम्प यांना जिवे मारण्याची जाहीर धमकी त्यांनी दिली आहे.

जनरल सुलेमानी यांचा उल्लेख हुतात्मा असा करीत रुहानी यांनी इराणी मंत्रिमंडळासमोर केलेल्या भाषणात ही धमकी देण्यात आली. अध्यक्षांच्या अधिकृत संकेतस्थळावर हे भाषण इंग्रजीमधून पोस्ट केले आहे. ‘सुलेमानी यांच्यावर हवाई हल्ला करून त्यांची हत्या करण्याचे कृत्य मूर्खपणाचे व मानहानिकारक असून ट्रम्पशाहीचा विनाश हा याचा एक परिणाम असेल. काही दिवसातच या गुन्हेगाराच्या आयुष्याचा अंत होईल आणि तो इतिहास जमा होईल, असे रुहानी यांनी म्हटल्याचे इराणी सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

हे वाचा - अमेरिकेने दहशतवाद्यांचा निधी रोखला

इराणच्या बगदाद विमानतळावर गेल्या वर्षी ३ जानेवारीला ड्रोन हल्ला करून अमेरिकेने सुलेमानी यांना ठार केले. या घटनेला रविवारी एक वर्ष होत आहे. या पार्श्‍वभूमीवर रूहानी यांनी हे धमकीवजा भाकीत केले आहे. रुहानी म्हणाले की, ट्रम्प यांच्या नंतरच्या काळातील परिस्थिती प्रादेशिक आणि स्थैर्यासाठी जास्त चांगली असेल, असा विश्‍वास मला आहे.

हे वाचा - परदेशी कर्मचाऱ्यांना ट्रम्प यांचा झटका; वर्किंग व्हिसा संदर्भात कटू निर्णय

हुतात्मा सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर रूहानी यांची अमेरिकेचा सूड घेण्याची भाषा केली होती. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांच्या रक्तपात घडवून त्यांचा सूड जोपर्यंत घेतला जाणार नाही, तोपर्यंत आमचा देश स्वस्थ बसणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iran president threatend to us president donald trump