इराण: अमेरिकन 'हेरा'स 10 वर्षांचा कारावास

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

इराणमध्ये अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांना मुक्‍त करण्यात यावे, असे आमचे आवाहन आहे. इराणला जाणाऱ्या सर्व अमेरिकन नागरिकांनी; विशेषत: दुहेरी नागरिकत्व असलेल्या नागरिकांनी इराणमधील प्रवासासंदर्भात देण्यात आलेल्या इशाऱ्याकडे काळजीपूर्वक पहावे

तेहरान - इराणमधील न्यायालयाने अमेरिकेतील प्रिन्सटन विद्यापीठाचा पदवीधर असलेल्या एका अमेरिकन विद्यार्थ्यास हेरगिरीच्या आरोपांतर्गत 10 वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे. शियुए वांग (वय 37) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

जन्माने चिनी असलेला वांग हा संशोधनाच्या नावाखाली अमेरिकेसाठी हेरगिरी करत होता, असे इराणमधील न्यायव्यवस्थेच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. मात्र या शिक्षेस आव्हान देता येऊ शकते, असेही या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.

"इराणमध्ये अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांना मुक्‍त करण्यात यावे, असे आमचे आवाहन आहे. इराणला जाणाऱ्या सर्व अमेरिकन नागरिकांनी; विशेषत: दुहेरी नागरिकत्व असलेल्या नागरिकांनी इराणमधील प्रवासासंदर्भात देण्यात आलेल्या इशाऱ्याकडे काळजीपूर्वक पहावे,'' अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर व्यक्त करण्यात आली आहे.

वांग याला गेल्या वर्षी (2016) अटक करण्यात आली होती. वांग याने तब्बल साडेचार हजार संवेदनशील कागदपत्रे "कॉपी' केली होती, असा दावाही इराणकडून करण्यात आला आहे.

Web Title: Iran sentences american citizen for spying