इराणचे राष्ट्राध्यक्ष रफसंजानी काळाच्या पडद्याआड

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

रफसंजानी हे इराणमधील कडव्या धार्मिक गोटाचे प्रतिनिधी असले; तरी पाश्‍चिमात्य देशांबरोबरील इराणचे तणावग्रस्त संबंध सुधारण्यासंदर्भात त्यांचे धोरण वास्तववादी असल्याचे मानण्यात येते. 'इराणमधील राजकीय बंद्यांची मुक्‍तता करण्यात यावी आणि राज्यघटनेच्या मर्यादित परिघात काम करण्यास तयार असलेल्या राजकीय पक्षांना अधिक स्वातंत्र्य देण्यात यावे,' अशा भूमिकेचाही त्यांनी पुरस्कार केला होता

तेहरान - इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अकबर हाशेमी रफसंजानी यांचे आज (रविवार) हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. ते 82 वर्षांचे होते.

रफसंजानी हे इराणचे 1989 ते 1997 अशा दीर्घ काळापर्यंत राष्ट्राध्यक्ष होते. यानंतर 2005 मध्ये लढविलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ते महमूद अहमदिनेजाद यांच्याकडून पराभूत झाले होते.

रफसंजानी हे इराणमधील कडव्या धार्मिक गोटाचे प्रतिनिधी असले; तरी पाश्‍चिमात्य देशांबरोबरील इराणचे तणावग्रस्त संबंध सुधारण्यासंदर्भात त्यांचे धोरण वास्तववादी असल्याचे मानण्यात येते. इराणमधील संसद व मार्गदर्शक मंडळामधील (गार्डियन कौन्सिल) वाद मिटविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संवेदनशील समितीचे अध्यक्ष म्हणूनही रफसंजानी यांनी काम पाहिले होते. याच समितीने 2013 मध्येही अध्यक्षीय निवडणुकीत उतरलेल्या रफसंजानी यांना अपात्र ठरविले होते.

2005 मध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रफसंजानी यांनी इराणमधील सरकारवर सार्वजनिकरित्या टीका केली होती. यानंतर देशातील सुधारणावाद्यांनाही रफसंजानी यांनी पाठिंबा दर्शविला होता. "इराणमधील राजकीय बंद्यांची मुक्‍तता करण्यात यावी आणि राज्यघटनेच्या मर्यादित परिघात काम करण्यास तयार असलेल्या राजकीय पक्षांना अधिक स्वातंत्र्य देण्यात यावे,' अशा भूमिकेचाही त्यांनी पुरस्कार केला होता.

Web Title: Iran's ex-President Rafsanjani dies