'इसिस'च्या अड्ड्यापासून इराकी फौजा 700 मीटरवर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

2015 पासून 'इसिस'च्या ताब्यातील भाग जिंकण्यात सरकारी फौजांना यश येत आहे. मोसूलमध्येही इराकी सैन्याचा विजय जवळपास निश्‍चित असला, तरीही ही लढाई कित्येक महिने सुरू राहू शकते, असा इशाराही गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

बगदाद : 'इसिस' या कट्टर दहशतवादी संघटनेचा प्रमुख अड्डा बनलेल्या मोसूल शहरापासून अवघ्या 700 मीटर अंतरापर्यंत इराकी सैन्याने मजल मारली आहे. यामुळे मोसूलवर पुन्हा ताबा मिळविण्यासाठी लवकरच इराकी सैन्य आणि 'इसिस'मध्ये चकमक होण्याची दाट शक्‍यता आहे. 

दोन वर्षांपूर्वी 'इसिस'ने मोसूलवर ताबा मिळविला होता. हे शहर पुन्हा नियंत्रणाखाली आणण्यासाठी इराकी सैन्य झगडत होते. इराकी सैन्या मोसूलच्या दिशेने आगेकूच करत असताना 'इसिस'च्या दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. हवाई हल्ला करून इराकी सैन्याने हा गोळीबार बंद पाडला. त्यानंतर इराकी सैन्याने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली. 

मोसूलच्या वाटेवर असलेले आणि 'इसिस'च्या ताब्यात असलेले बझ्वाया या गावावरही इराकी सैन्याने नियंत्रण मिळविले आहे. 'आज रात्री सर्वकाही योजनेनुसार पार पडले, तर आम्ही मोसूलपासून 700 मीटर अंतरावर असू,' असे इराकच्या दहशतवाद विरोधी पथकातील लेफ्टनंट कर्नल मुन्ताधर सालेम यांनी सांगितले. 

'इसिस'विरोधातील या लढाईमध्ये इराकी सैन्याला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीने हवाई दलाचे सामर्थ्य पुरविले आहे. या बळावर इराकने मोसूलला सर्व बाजूंनी घेरण्याची व्यूहरचना अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मोसूल हा 'इसिस'चे इराकमधील शेवटचा बालेकिल्ला आहे. मोसूलवरील चढाई यशस्वी करण्यासाठी इराकी सैन्याने आधी मोसूलच्या पश्‍चिमेला असलेल्या तल अफार या शहराकडे मोर्चा वळविला आहे. हे शहर ताब्यात आल्यास मोसूलमधील 'इसिस'ला सीरियातून मिळणारी रसद तोडता येईल, असा इराकी सैन्याचा अंदाज आहे. 

2015 पासून 'इसिस'च्या ताब्यातील भाग जिंकण्यात सरकारी फौजांना यश येत आहे. मोसूलमध्येही इराकी सैन्याचा विजय जवळपास निश्‍चित असला, तरीही ही लढाई कित्येक महिने सुरू राहू शकते, असा इशाराही गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. 

Web Title: Iraqi forces in striking distance from IS-stronghold Mosul