ऐतिहासिक निमरुड इसिसच्या तावडीतून मुक्त

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

इसिसकडून उध्वस्त करण्यात आलेल्या अवशेषांमध्ये जगप्रसिद्ध "लमासु' मूर्तींचाही समावेश होता. ख्रिस्तपूर्व काळातील नवव्या शतकामधील असीरियाचा सम्राट अशुर्नसिर्पाल द्वितीय याच्या राजवाड्याबाहेरील मानवी चेहऱ्याच्या व पंख असलेल्या बैलांच्या या मूर्ती होत्या. याशिवाय या भागामधील देवळेही उधवस्त करण्यात आली होती 

बगदाद - सुमारे 3 हजार वर्षांपूर्वीच्या असीरियन संस्कृतीमधील महत्त्वपूर्ण शहर असलेले निमरुड जिंकण्यात इराकच्या सैन्यदलास यश आले आहे. अखिल मानवजातीचा संवेदनशील व महत्त्वपूर्ण ठेवा असलेल्या या शहराची इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने दोन वर्षांपूर्वी अक्षरश: धूळदाण उडविली होती. निमरुडसहितच उत्तर इराकमधील इतर ऐतिहासिक शहरांची व संस्कृती केंद्रांचेही इसिसकडून अतोनात नुकसान करण्यात आले होते.

"इस्लामपूर्व काळामधील सर्व सांस्कृतिक ठेवा म्हणजे "जाहिलीयत' (अज्ञान) असून ते उध्वस्त करणे आवश्‍यक असल्याची,' इसिसची सुस्पष्ट भूमिका आहे. या पार्श्‍वभूमीवर, निमरुडमधील मूर्ती व इतर अवशेष इसिसकडून घणाचे घाव घालून फोडण्यात आले ; तसेच अक्षरश: बुलडोझर चालवून चक्काचूर करण्यात आले होते.

उध्वस्त करण्यात आलेल्या अवशेषांमध्ये जगप्रसिद्ध "लमासु' मूर्तींचाही समावेश होता. ख्रिस्तपूर्व काळातील नवव्या शतकामधील असीरियाचा सम्राट अशुर्नसिर्पाल द्वितीय याच्या राजवाड्याबाहेरील मानवी चेहऱ्याच्या व पंख असलेल्या बैलांच्या या मूर्ती होत्या. याशिवाय या भागामधील देवळेही उधवस्त करण्यात आली होती. निमरुडमधील या सांस्कृतिक हानीमुळे सर्व जगामधून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

इराकची जीवनदायिनी असलेल्या तैग्रिस नदीच्या पूर्व तटावर असलेले निमरुड मोसूल या आधुनिक इराकमधील अत्यंत महत्त्वपूर्ण शहराच्या दक्षिणेस अवघ्या तीस किमी अंतरावर आहे. या भागामध्ये सध्या इसिस व इराकच्या सैन्याची निकराची लढाई सुरु आहे.

निमरुड परत जिंकण्यात आलेले यश हा मानवतेचाच विजय असल्याची प्रतिक्रिया इराकचे उप सांस्कृतिक मंत्री कैस हुसेन रशीद यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली.

Web Title: Iraqi Troops Recapture Nimrud