मॅंचेस्टरचा दहशतवादी हल्ला 'इसिस'कडूनच...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

दहशतवादाचा कधीच विजय होऊ शकणार नाही. आमची मूल्ये, देश आणि संस्कृती या दहशतवाद्यांच्या कृत्याला पुरून उरेल.
- थेरेसा मे, ब्रिटनच्या पंतप्रधान

लंडन :'मॅंचेस्टर अरिना'मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी 'इसिस' या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला. 'आमच्या एका 'सैनिका'ने हा हल्ला केला', असे 'इसिस'तर्फे सांगण्यात आले.

'हा मॅंचेस्टरच्या इतिहासातील सर्वांत भीषण हल्ला आहे', अशी प्रतिक्रिया ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केली. मॅंचेस्टर अरिनामधील हल्ल्याची बातमी आल्यानंतर 'इसिस'च्या समर्थकांनी जल्लोष सुरू केल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावरून झळकू लागली. 'इराकमधील हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून हा हल्ला केला', असा दावाही केला जात आहे.

'टेलिग्राम'मधून 'इसिस'ने पाठविलेल्या एका संदेशामध्ये म्हटले आहे, की ब्रिटनच्या मॅंचेस्टर शहरातील एका गर्दीच्या ठिकाणी आमच्या 'सैनिका'ने स्फोटके ठेवली. सुरवातीला हा हल्ला आत्मघातकी हल्लेखोराने केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता.

दहशतवादाचा कधीच विजय होऊ शकणार नाही. आमची मूल्ये, देश आणि संस्कृती या दहशतवाद्यांच्या कृत्याला पुरून उरेल.
- थेरेसा मे, ब्रिटनच्या पंतप्रधान

Web Title: ISIS claims responsibility for Manchester Terror Attack