इसिसचे "आर्थिक गणित' कोसळणार?

वृत्तसंस्था
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

2014 मध्ये तब्बल 1.9 अब्ज डॉलर्स पर्यंत जाऊन पोहोचलेला इसिसचा महसूल 2016 मध्ये 87 कोटी डॉलर्सपर्यंत घसरला आहे. इसिसचे 'व्यावसायिक प्रारुप' अपयशी ठरल्याचाच हा पुरावा असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे

बगदाद - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यास अहवालामधून स्पष्ट झाले आहे.

इसिसच्या नियंत्रणामधोन मुक्त होत असलेल्या जमिनीबरोबरच या संघटनेस मोठा आर्थिक फटका बसत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. इसिसने 2014 मध्ये ताब्यात घेतलेल्या बॅंका, इंधन विहीरी आणि शस्त्रागारांसहित इतर संसाधने आता संघटनेच्या नियंत्रणामधून हळुहळू निसटत चालली आहेत. यामुळे 2014 मध्ये तब्बल 1.9 अब्ज डॉलर्स पर्यंत जाऊन पोहोचलेला इसिसचा महसूल 2016 मध्ये 87 कोटी डॉलर्सपर्यंत घसरला आहे. याचबरोबर, या काळात पॅरिस, ब्रसेल्स, बर्लिन या ठिकाणी इसिसकडून घडविण्यात आलेले दहशतवादी हल्ले हे सीरिया व इराकमधील इसिसच्या मध्यवर्ती नेतृत्वाकडून कमीत कमी आर्थिक सहाय्य घेत घडविण्यात आल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी मांडले आहे.

कर, शुल्क, तेल, खंडणी आणि लूट हे इसिसच्या महसूलाचे मुख्य स्त्रोत होते. मात्र इसिसच्या नियंत्रणामधून भूप्रदेश झपाट्याने मुक्त होत असल्याने हा महसूलाचा प्रवाहही आटू लागला आहे. इसिसचे 'व्यावसायिक प्रारुप' अपयशी ठरल्याचाच हा पुरावा असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Web Title: ISIS facing financial fall down