तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

तिच्यासमोर भात व मांस ठेवण्यात आले. तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या या दुदैवी महिलेने गरजेपोटी हे अन्न सेवन केले. तिचे खाऊन झाल्यानंतर क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या दहशतवाद्यांनी तिला हे तिच्याच शिजविलेल्या बाळाचे मांस असल्याचे सांगितले

कैरो - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून एका असहाय्य मातेस अक्षरश: तिचे बाळ खाऊ घालण्याचे निर्घृण कृत्य करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अक्षरश: दगडालाही पाझर फुटेल, अशी क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या एका घटनेमुळे संवेदनशीलता व मानवता थिजून गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

इसिसच्या दहशतवाद्यांच्या तावडीत एका याझिदी महिलेस "सेक्‍स स्लेव्ह' म्हणून ठेवण्यात आले होते. या महिलेचे एक वर्षाचे बाळही दहशतवाद्यांकडून हिसकाविण्यात आले होते. तीन दिवस असह्य अत्याचार सहन करत असलेल्या या महिलेस उपाशी ठेवण्यात आले होते. यानंतर तिच्यासमोर भात व मांस ठेवण्यात आले. तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या या दुदैवी महिलेने गरजेपोटी हे अन्न सेवन केले. तिचे खाऊन झाल्यानंतर क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या दहशतवाद्यांनी तिला हे तिच्याच शिजविलेल्या बाळाचे मांस असल्याचे सांगितले.

या घटनेच्या निमित्ताने इसिसकडून याझिदी समुदायावर केले जाणारे अनन्वित अत्याचार पुन्हा एकदा हिडीसपणे सामोरे आले आहेत. इराकच्या संसदेमधील एकमेव याझिदी लोकप्रतिनिधी असलेल्या व्हिआन दाखिल यांनी याबद्दल साश्रुनयनाने बोलताना इसिसने एका दहा वर्षांच्या मुलीवर तिच्या कुटूंबीयांसमोरच बलात्कार करत ठार मारल्याचीही माहिती दिली.

याझिदी हे "दानवपूजक' असल्याची इसिसची धारणा असून या समुदायाच्या महिलांवर 2014 पासून अमानुष अत्याचार करण्यात आले आहेत. इसिसकडून पकडण्यात आलेल्या याझिदी महिला व मुलांचा धर्म बदलून त्यांना मुसलमान करण्यात येते; वा ठार मारण्यात येते. धर्म बदलल्यानंतर या महिलांना बाजारात विकण्यात येते.

दुदैवाचे दशावतार पाहिलेल्या या महिलांना परत याझिदी समुदायामध्ये घ्यावयाचे असल्यास त्यांना अक्षरश: "विकत' घ्यावे लागते, असेही दाखिल यांनी सांगितले.

Web Title: Isis fed baby to its mother