चीनच्या निर्णयामुळे पाकला झटका

वृत्तसंस्था
बुधवार, 6 डिसेंबर 2017

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा निधी थांबविला

इस्लामाबाद: चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) अंतर्गत येणाऱ्या पाकिस्तानातील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा निधी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी प्रशासनाला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. रस्ते प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चीनने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा निधी थांबविला

इस्लामाबाद: चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) अंतर्गत येणाऱ्या पाकिस्तानातील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा निधी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी प्रशासनाला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. रस्ते प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चीनने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

सुमारे 50 अब्ज डॉलर खर्च करून विकसित करण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या (सीपीईसी) माध्यमातून पाकिस्तानात मोठे रस्ते प्रकल्प सुरू आहेत. मात्र, "सीपीईसी' अंतर्गत सुरू असलेल्या तीन मोठ्या रस्ते प्रकल्पांना दिला जाणारा निधी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर निधी थांबविण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला असल्याचे समजते. पाकिस्तानातील "डॉन' वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चीनच्या महत्त्वाकांक्षी "वन बेल्ट, वन रोड' प्रकल्पाच्या अंतर्गत सुमारे 50 अब्ज डॉलरपेक्षाही अधिक निधी खर्च करून "सीपीईसी'ची निर्मिती केली जात आहे. हे आर्थिक क्षेत्र पाकव्याप्त काश्‍मीरमधून जाणार आहे. या माध्यमातून सध्या पाकिस्तानात रस्ते निर्मितीचे तीन मोठे प्रकल्प सुरू आहेत. चीनचा शिंगजियांग आणि पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतांना जोडण्याचे नियोजन आहे.
या मोठ्या तीन रस्ते प्रकल्पांची निर्मितीची घोषणा सुरवातीला पाकिस्तान सरकारने केली होती. मात्र, नंतर त्यांचा समावेश "सीपीईसी'मध्ये करण्यात आला. या प्रकल्पांना चीनकडून मोठ्या प्रमाणात निधीचा पुरवठा केला जाणार आहे.

भ्रष्टाचार पाकला भोवणार
सुरवातीच्या नियोजनाप्रमाणे निधी देण्यास चीनकडून नकार देण्यात आला असून, नव्याने जारी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा निधी दिला जाईल, असे चीनकडून पाकिस्तानला कळविण्यात आले आहे. पाकिस्तानातील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या "सीपीईसी'च्या निधीतील भ्रष्टाचाराच्या बातम्यांमुळे चीन सरकारने हात आखडता घेतला असून, रस्ते प्रकल्पांचा निधी तात्पुरता थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने "डॉन' वृत्तपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मोठे रस्ते प्रकल्प ............अंदाजे खर्च
- डेरा इस्माईल खान - झोब रस्ता (210 किमी)........... 81 अब्ज रुपये
- खुझदार - बसिमा रस्ता (110 किमी)................ 19.76 अब्ज रुपये
- काराकोरम महामार्ग (136 किमी).............. 8.5 अब्ज रुपये

Web Title: islamabad news China's decision and pakistan