यूएई आणि बहारिनसोबतच्या ऐतिहासिक करारावर इस्त्राईलची स्वाक्षरी; ट्रम्प बनले साक्षीदार

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 September 2020

वॉशिंग्टन स्थित व्हाईट हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला.

वॉशिंग्टन- इस्त्राईलसोबत झालेल्या ऐतिहासिक शांती करारावर आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि बहारिनने स्वाक्षरी केली. वॉशिंग्टन स्थित व्हाईट हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची घोषणा केली. या करारामागे ट्रम्प यांचा मुत्सद्दीपणा असल्याचं म्हटलं जातंय. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. 

इस्त्राईल, संयुक्त अरब अमिराती आणि बहारिन आता एकमेकांच्या देशात आपला दुतावास ठेवू शकतील आणि एकमेकांसोबत काम करु शकतील. या करारामुळे सिद्ध झालंय की, देश भूतकाळातील पूर्वग्रह तोडत आहेत. आज देशांनी स्वाक्षरी करुन इतिहास रचलाय, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. 

 

शांतता करारासाठी इस्त्राईलचे पंधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू, यूएईचे शेख खलीफा बिन जायद अल नाहयान आणि बहारिनचे शाह हमद बिन अल खलीफा अमेरिकेत आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या एका महिन्याच्या काळात इस्त्राईल आणि दोन अरब राष्ट्रात मैत्री करार घडवून आणला आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल असून यामुळे नव्या युगाला सुरुवात होईल, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली होती. 13 ऑगस्ट रोजी इस्त्राईल आणि युएईमध्ये कराराची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात इस्त्राईल-बहारिन कराराची घोषणा करण्यात आली होती.

यूएई आणि बहारिनने इस्त्राईलसोबत वेगवेगळा करार केला आहे. या ऐतिहासिक करारात डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आणि जावई जेरेड कुशनर यांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच येत्या काळात आणखी चार ते पाच अरब राष्ट्र इस्त्राईलसोबत शांती करार करतील, असे सूतोवाच डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहेत. त्यामुळे येत्या काळात आणखी काही अरब राष्ट्रांशी इस्त्राईलशी मैत्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इस्त्राईलचा युएई आणि बहारिनशी करार झाल्याने इराणने संताप व्यक्त केला आहे. या देशांनी मुस्लिम राष्ट्रासोबत विश्वासघात केला असल्याची टीका अयातोला खामेनी यांनी केली. 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Israel signing of a historic peace agreement with the UAE and Bahrain Trump became a witness