जयशंकर यांची ट्रम्प प्रशासनाशी संवेदनशील चर्चा

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जयशंकर यांनी केलेला हा तिसरा अमेरिका दौरा आहे. भारत अमेरिका द्विपक्षीय संबंध सध्या एका महत्त्वपूर्ण वळणावर असताना जयशंकर यांची हे अमेरिका दौरे अत्यंत संवेदनशील मानले जात आहेत

वॉशिंग्टन - भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच आर मॅकमास्टर यांची भेट घेतली. या संवेदनशील भेटीमध्ये भारत व अमेरिकेमधील व्यूहात्मक भागीदारीसह दहशतवादविरोधी धोरणासंदर्भात विशेषत्वाने चर्चा झाली. याशिवाय, जयशंकर यांनी "हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज'चे अध्यक्ष पॉल रायन यांच्याशीही चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारत व अमेरिकेमधील आर्थिक व संरक्षणात्मक भागीदारीचा आणखी विकास करण्याच्या दृष्टिकोनामधून संवेदनशील असलेल्या मुद्यांसंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाली. अमेरिकेतील कॅन्सास येथे श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणास ठार करण्यात आल्यासंदर्भातही रायन यांनी यावेळी शोक व्यक्त केला.

रायन व मॅकमास्टर यांच्यासहित जयशंकर हे ट्रम्प प्रशासनामधील अन्य उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या भेटीही घेणार आहेत. ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जयशंकर यांनी केलेला हा तिसरा अमेरिका दौरा आहे. ट्रम्प यांचे भारतविषयक धोरण अद्यापी पुरेसे स्पष्ट झालेले नाही. भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासहित एकंदरच भारत अमेरिका द्विपक्षीय संबंध सध्या एका महत्त्वपूर्ण वळणावर असताना जयशंकर यांची हे अमेरिका दौरे अत्यंत संवेदनशील मानले जात आहेत.

Web Title: Jaishankar meets U.S. NSA, discusses bilateral ties