महिलांना मज्जाव;नग्नावस्थेतील पुरुष: 'ते' जपानी बेट आता "हेरिटेज साईट'

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

तब्बल "दोन तास' चाललेल्या या वार्षिकोत्सवासाठी केवळ 200 पुरुषांना प्रवेश देण्यात आला; व त्यांना सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागली. पुरुषांनी विवस्त्रावस्थेत समुद्रात स्नान करुनच या बेटावर पाय ठेवण्याची परंपरा आहे

टोकियो - जपानमधील एका वैशिष्ट्यपूर्ण बेटास "युनेस्को'ने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. महिलांना पूर्णपणे मज्जाव असलेल्या या बेटावरील देवीचे दर्शन घेण्यासाठी पुरुषांना समुद्रामध्ये नग्नावस्थेत स्नान करणे बंधनकारक आहे.

ओकिनोशिमा असे या बेटाचे नाव आहे. या बेटावरील देवीची पूर्जा अर्चना करण्यासाठी एक "शिंतो' पुजारी असून; या बेटावरील या विचित्र परंपरेस शेकडो वर्षांचा इतिहास आहे! जपानच्या दक्षिणेस असलेल्या क्‍युशू बेटाच्या वायव्येस काही अंतरावर हे बेट आहे. व्यूहात्मकदृष्टयाही बहुमूल्य महत्त्व असलेल्या बेटावर कोट्यवधी रुपये किंमतीचा खजिनाही सापडला आहे.

पूर्व समुद्रामधील (सी ऑफ जपान) या बेटावर नुकताच वार्षिकोत्सव आयोजित करण्यात आला होता. तब्बल "दोन तास' चाललेल्या या वार्षिकोत्सवासाठी केवळ 200 पुरुषांना प्रवेश देण्यात आला; व त्यांना सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागली. पुरुषांनी विवस्त्रावस्थेत समुद्रात स्नान करुनच या बेटावर पाय ठेवण्याची परंपरा आहे.

युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केल्यामुळे आता येथील प्रशासन चिंतेत पडले आहे! या घोषणेमुळे पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहून बेट "नष्ट' होईल, अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे आता पुजाऱ्यांचा अपवाद वगळता इतर सर्वांना या बेटावर येण्यास मज्जाव करण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या बेटावर येण्यास महिलांना असलेल्या मज्जावाचा "लैंगिक असामनते'शी काहीही संबंध नसल्याचा दावा बेट प्रशासनाकडून करण्यात आला आहे. महिलांनी सागरीमार्गाने इतका प्रवास करणे धोकादायक असल्याने हा नियम बनविण्यात आल्याची भूमिका यासंदर्भात घेण्यात आली आहे.

Web Title: Japan’s ancient ritual island Okinoshima joins Unesco World Heritage sites