लग्न करणाऱ्यांना सरकार देणार 4 लाख रुपये; जपानमध्ये जन्मदर वाढवण्यासाठी योजना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यानं जपानची चिंता वाढली आहे. यावर उपाय करण्यासाठी जपानने मोठ्या प्रमाणावर मोहिम सुरू केली  असून यात काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

टोकियो - जपान सरकारने घटत चाललेला जन्मदर वाढवण्यासाठी एप्रिलपासून एक योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्याला जपान सरकार 6 लाख येन म्हणजे जवळपास 4 लाख 25 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देणार आहे. जपानमधील जन्मदर वेगानं घटत चालला आहे. तसंच वृद्धांची संख्याही वाढत आहे. असा परिस्थितीत जन्मदर वाढावा यासाठी एप्रिलपासून जपानमध्ये सरकारने मोहिमच हाती घेतली आहे. गेल्या वर्षी जपानमध्ये फक्त 8 लाख 65 हजार मुलांनी जन्म घेतला. तर मृत्यू झालेल्यांची संख्या त्यापेक्षा 5 लाख 12 हजारांनी जास्त होती. 

लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक वृद्ध असलेला देश अशी जपानची ओळख निर्माण होत चालली आहे. एकूण लोकसंख्या 12 कोटी 68 लाख इतकी असून सरकारने दिलेल्या माहितीनुसार यंदा जन्मदर  1.8 टक्के असेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 2019 मध्ये जन्मदर 1.4 टक्क्यांपेक्षा जास्त होता. जपानमध्ये 100 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. लँसेटने दिलेल्या रिपोर्टनुसार जन्मदरात बदल झाला नाही तर जपानमध्ये 2040 पर्यंत वृद्धांची संख्या 35 टक्के इतकी होईल. 

जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यानं जपानची चिंता वाढली आहे. यावर उपाय करण्यासाठी जपानने मोठ्या प्रमाणावर मोहिम सुरू केली  असून यात काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. लग्न करणाऱ्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असून नये. तसंच ज्या जोडप्याचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असेल त्यांचे उत्पन्न 33 लाखांहून अधिक नसावं.

हे वाचा - कोरोनावर लस प्रभावी ठरेल अशी शाश्वती नाही - WHO

जपानशिवाय इटलीनेसुद्धा जन्मदर वाढवण्यासाठी एक अभियान सुरु केलं आहे. मात्र यामध्ये थोडा फरक आहे. जपानमध्ये लग्नासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे तर इटलीत मुलं जन्माला घातल्यानंतर पैसे दिले जात आहे. इटलीतही जन्मदराची परिस्थिती बिकट आहे. इथे मुल जन्माला आल्यानंतर 70 हजार रुपये दिले जातात. युरोपीय देश अॅस्टानियात जन्मदर वाढवण्यासाठी नोकरी करणाऱ्यांना दीड वर्षे पूर्ण वेतनासह सुट्टी दिली जाते. तसंच तीन मुलं असलेल्या कुटुंबाला दर महिन्याला 25 हजार रुपयांचा बोनसही दिला जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: japan Couples Can Soon Get Over 4 lakh after get married