जिनपिंग-किम जोंग यांची ईशान्य चीनमध्ये खलबते 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 मे 2018

जिनपिंग आणि किम जोंग यांच्यातील बैठक ही सकारात्मक घटना आहे. याबाबत मी जिनपिंग यांच्याशी लवकरच संवाद साधणार आहे. 
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष 

बीजिंग, ता. 8 (पीटीआय) ः चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात आज ईशान्य चीनमधील दालियन शहरात चर्चा झाल्याची माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यातील आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या जिनपिंग आणि किम जोंग यांच्या बैठकीकडे पाहिले जात आहे.

 
जिनपिंग आणि किम जोंग यांच्या आजच्या भेटीची पूर्वसूचना माध्यमांना देण्यात आलेली नव्हती. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे की जिनपिंग आणि किम जोंग यांच्यात सोमवारी आणि मंगळवारी चर्चा झाली. किम जोंग आणि जिनपिंग यांची मार्चपासूनची ही दुसरी भेट आहे. उत्तर कोरियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना चीनने पाठिंबा दिल्यानंतर उत्तर कोरियाने माघार घेत अमेरिकेबरोबर चर्चेची तयारी दाखविली असून, त्यासाठी जिनपिंग यांनी पुढाकार घेतला आहे.

 
कॉम्रेड किम जोंग यांच्याशी झालेल्या पहिल्या बैठकीनंतर चीन आणि उत्तर कोरिया यांच्या दरम्यानच्या संबंधांमध्ये सकारात्मक प्रगती झाली आहे. तसेच, कोरियन द्वीपकल्पातील तणाव कमी होण्यास मदत झाली आहे, असे जिनपिंग यांनी स्पष्ट केले होते. ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये बैठक होण्याची शक्‍यता दक्षिण कोरियातील वृत्तपत्राने सोमवारी वर्तविली होती. 

कॉम्रेड जिनपिंग यांच्याबरोबर झालेली ऐतिहासिक पहिली बैठक अतिशय चांगल्या वातावरणात झाली होती. या बैठकीत अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. 
- किम जोंग उन, उत्तर कोरियाचे अध्यक्ष 

जिनपिंग आणि किम जोंग यांच्यातील बैठक ही सकारात्मक घटना आहे. याबाबत मी जिनपिंग यांच्याशी लवकरच संवाद साधणार आहे. 
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jinping and Kim Jong in the northeast of China