अति जंकफूड खाण्याने तो झाला अंध ! 

बुधवार, 4 सप्टेंबर 2019

जंकफूड जास्त प्रमाणात खाल्यामुळे एका 19 वर्षीय तरुणाला अंधत्व आणि बहिरेपणाला सामोरे जावे लागत आहे.

ब्रिस्टॉल : जंकफूड म्हटलं की आजच्या पिढीचे आवडते खाद्यपदार्थ. मात्र, जंकफूड जास्त प्रमाणात खाल्यामुळे एका 19 वर्षीय तरुणाला अंधत्व आणि बहिरेपणाला सामोरे जावे लागत आहे. लहानपणापासून त्याला जेवणाऐवजी चिप्स, ब्रेड, पिझ्झा आणि तत्सम जंकफूड खायची सवय लागली होती. त्यातून पुरेसे पोषण मूल्ये न मिळाल्याने त्याला या संकटाला सामोरे लागल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

इंग्लंडच्या ब्रिस्टॉल शहरातील एका तरूणाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. लहानपणापासून सात्विक जेवण, फळे, भाज्या यापैकी कोणतेही पदार्थ त्याला खायला दिले की तो नाक मुरडायचा. अगदी शाळेत जाताना दिलेला जेवणाचा डबा देखील तो तसाच परत आणायचा. त्याऐवजी तो केवळ जंकफूडच खायचा. त्यामुळे पोषणमूल्यांच्या अभावी त्याला "न्यूट्रिशनल ऑप्टीक न्यूरोपथी' हा आजार जडला आहे. या आजाराचे निदान लवकरच झाले असते किंवा लवकर उपचार केले असते, तर ही वेळ आली नसती. मात्र, या तरूणाच्या बाबतीत फारच उशीर झाला आहे. जंकफूड मोठ्या प्रमाणात खाल्यामुळे त्याच्या डोळ्याच्या मज्जा कायमस्वरूपी बाधीत झाल्या आहेत, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली. 

सुरुवातीला कोणताही त्रास जाणवला नाही; मात्र वयाच्या 14 वर्षापासून त्याच्या दृष्टीवर परिणाम जाणवायला लागला. त्यानंतर हा दोष वेगाने वाढत जात, आता तर तो पूर्णपणे अंध झाला आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या श्रवणक्षमतेवर देखील परिणाम झाला असून त्यामुळे त्याला पुढील शिक्षण, नोकरीवर पाणी सोडावे लागले.