पाकिस्तानमधील कनिष्क स्तुप ठरावा जागतिक वारसा

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

इतिहासतज्ज्ञ हुसेन यांची मागणी; पाकिस्तानमध्ये पहिल्या शतकात बांधल्याचा दावा

पेशावर- पाकिस्तानमधील कनिष्क स्तुप हा अत्यंत प्राचीन असून, त्यांचे बांधकाम वैशिष्टपूर्ण आहे. या बुद्ध स्मारकाला जगातील आठव्या जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, यासाठी "युनेस्को'कडे मागणी करावी, असे आवाहन अमेरिकेतील इतिहासतज्ज्ञाने केले आहे.

इतिहासतज्ज्ञ हुसेन यांची मागणी; पाकिस्तानमध्ये पहिल्या शतकात बांधल्याचा दावा

पेशावर- पाकिस्तानमधील कनिष्क स्तुप हा अत्यंत प्राचीन असून, त्यांचे बांधकाम वैशिष्टपूर्ण आहे. या बुद्ध स्मारकाला जगातील आठव्या जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, यासाठी "युनेस्को'कडे मागणी करावी, असे आवाहन अमेरिकेतील इतिहासतज्ज्ञाने केले आहे.

पेशावरमधील कनिष्क स्तुपाचे बांधकाम उल्लेखनीय आहे. इतिहासाच्या पुस्तकातील उल्लेखानुसार मनुष्याच्या कल्पक बुद्धीचे व श्रमाचे ते एक उदाहरण आहे. त्यामुळे जगातील आठव्या आश्‍चर्याचा दर्जा मिळण्यास हा स्तुप अत्यंत योग्य आहे, असे मत इतिहासतज्ज्ञ अमजद हुसेन यांनी गुरुवारी व्यक्त केले. येथील व्हिक्‍टोरिया सभागृहात "कनिष्क विहार, प्राचीन वटवृक्ष आणि पवित्र भिक्षापात्र' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. "युनेस्को'ने कनिष्क स्तुपला आठवे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करावे व यासाठी जपान व चीनची मदत घ्यावी, असे ते म्हणाले.

हुसेन हे मूळचे पेशावरचे असून, हृदयरोगतज्ज्ञ म्हणून ते अमेरिकेत काम करतात. वैद्यकीय पेशाबरोबरच त्यांना इतिहासातही रस आहे. इतिहास, संस्कृती, धर्म, भाषा व सांस्कृतिक वारसा या विषयांवर त्यांची 16 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पेशावरमधील प्राचीन स्थळांची माहिती देताना ते म्हणाले, की पेशावरपासून जवळ असलेल्या गुंज गेट ज्याला "शहा जी की डेरी' असे म्हटले जाते हा स्तुप आहे. इसवी सनच्या पहिल्या शतकात कुशान कनिष्क याच्या राज्यात हा स्तुप बांधला आहे. इसवी सननंतर 620-645 च्या काळात या भागात आलेला चिनी पर्यटक ह्युएन त्संग याने विषयी लिहिले असून, "वास्तुस्थापत्यानुसार बांधलेली आशियाच्या या भागातील सर्वांत उंच इमारत,' असे तिचे वर्णन केले आहे.

गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव सर्व जगभर पसरलेला होता. त्याचे प्रतीक म्हणजे कनिष्क स्तुप येथील त्यांच्या अस्थींचा तुकडा हे आहे. म्हणूनच ही वास्तू जगातील आठवे आश्‍चर्य म्हणून जाहीर व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. या पेटीवर कनिष्क राजवटीतील राजांची नावे व चित्रे कोरलेली आहेत. हे अवशेष ब्रिटिशांनी म्यानमारला भेट दिले आहेत. मंडाले येथील मुख्य पॅगोड्यात जतन केले असून, ब्रॉंझची पेटी पेशावर संग्रहालयात ठेवलेली आहे. या पेटीची प्रतिकृती ब्रिटिश संग्रहालयात आहे, अशी माहिती हुसेन यांनी दिली. या स्तुपाचे पुरातत्व महत्त्व लक्षात घेऊन त्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

स्तुपात आढळल्या बुद्धांच्या अस्थी
कनिष्क स्तुपाची उंची ही सध्याच्या तेरा मजली इमारतीएवढी असून, शेजारील मठ हा बौद्ध धर्मोपदेशक वसुबंध व पर्व यांच्याशी संबंधित आहे. या भागातून बुद्ध धर्म लयाला गेल्यानंतर कनिष्क स्तुप व बौद्ध मठाचा शोध घेणे हळूहळू बंद झाले. स्तुपाची पार्श्‍वभूमी व धार्मिक महत्त्व विशद करताना हुसेन म्हणाले, ""मार्च 1909मध्ये झालेल्या उत्खननात अमेरिकेचे वास्तुविशारद व पेशावर संग्रहालयाचे पहिले परीक्षक डी. बी. स्पूनर यांना या स्तुपाचा शोध लागला आणि पुरातत्व जगाचे लक्ष वेधले गेले. सोनेरी मुलामा दिलेल्या ब्रॉंझमधील पेटीचे अवशेष त्यांना आढळले. यात गौतम बुद्धांच्या अस्थींचा तुकडा व रक्षा त्यात ठेवलेली होती.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanishka stupa in Pakistan found a World Heritage Site