कॅन्सस हल्ला : अमेरिका वाईटाविरुद्ध एक होते- ट्रम्प

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

ट्रम्प यांचे भाषण जसेच्या तसे वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात अध्यक्ष ट्रम्प यांनी संबोधित केले. काँग्रेससमोरील ट्रम्प यांचे हे पहिलेच भाषण होते. त्यावेळी त्यांनी कॅन्ससमधील घटनेवर आवर्जून प्रतिक्रिया व्यक्त केली. 

वॉशिंग्टन- कोणत्याही स्वरुपातील द्वेष आणि वाईट गोष्टींचा निषेध करण्यासाठी अमेरिका एक होते, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. कॅन्सस येथील हल्ल्यात भारतीय अभियंत्याची हत्या झाल्यानंतर ट्रम्प यांनी प्रथमच त्यावर भाष्य केले.

ते म्हणाले, "अलीकडे ज्यू कम्युनिटी सेंटर्सला लक्ष्य करून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि ज्यूंच्या दफनभूमींचे करण्यात आलेले नुकसान, तसेच मागील आठवड्यातील कॅन्सस शहरातील गोळीबार... यावरून दिसते की, आपले राष्ट्र धोरणांवर एक नसेल, मात्र सर्व प्रकारचा द्वेष आणि वाईट गोष्टींविरोधात आपला देश एकत्रितपणे उभा राहतो."

कॅन्ससमधील निर्घृण हत्येबाबत ट्रम्प यांनी आपल्या भाषणात जाहीर निषेध नोंदवावा अशी मागणी भारतीय-अमेरिकन संघटना आणि संसद सदस्यांकडून करण्यात येत होती. त्यानंतर ट्रम्प यांनी कॅन्सस हल्ल्याचा आवर्जून उल्लेख केला. फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (FBI) या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

रिपब्लिकनचे कॅन्सस येथील काँग्रेस सदस्य केविन योडर म्हणाले, 'या अत्यंत प्रभावी व्यासपीठावरून राष्ट्राध्यक्षांनी त्या द्वेषपूर्ण कृत्याचा बेधडकपणे निषेध करावा, आणि कोणताही अमेरिकन नागरिक हा त्याच्या समाजामध्ये भयभीत राहू नये असा प्रबळ संदेश द्यावा, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. राजकीय आणि धार्मिक मतांतील वैविध्यामुळे आपला देश महान बनतो. या संधीचा ट्रम्प यांनी उपयोग करावा.'

मागील आठवड्यातील झालेल्या हल्ल्यात श्रीनिवास कुचिभोतला याचा बळी गेला आणि आलोक मादासनी, इयान ग्रिल हे जखमी झाले. या संवेदनाहीन हल्ल्यासंदर्भात मी व्हाईट हाऊसच्या संपर्कात आहे, असे योडर यांनी सांगितले. 
 

Web Title: Kansas shooting: Donald Trump condemns attack on Indian, says US stands united against hate