कर्तारपूर प्रवेशाबाबत पाकची कोलांटी

शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

कर्तारपूरला जाऊ की नको? - सिद्धू चंडीगड - कर्तारपूर कॉरिडॉरच्या पाकिस्तानमध्ये होणाऱ्या उद्‌घाटन कार्यक्रमाला जाण्यास मला मनाई आहे का हे स्पष्ट करावे, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पाठविले आहे. या संदर्भात त्यांचे हे तिसरे पत्र आहे.  सिद्धू यांनी पत्रात म्हटले आहे, की मी कर्तारपूरला जाण्यास सरकारची मनाई असल्यास त्यांनी मला स्पष्टपणे ‘नाही’ असे सांगावे. कायद्याचे पालन करणारा नागरिक असल्याने मी तिकडे जाणार नाही. मात्र, माझ्या पत्राला उत्तरच मिळाले नाही तर लक्षावधी शीख यात्रेकरू जातात त्याप्रमाणे व्हिसाच्या साह्याने कर्तारपूरला जाईल.

इस्लामाबाद - कर्तारपूर कॉरिडॉरमधून पाकिस्तानात येण्यासाठी भारतीय यात्रेकरूंना दिल्या जाणाऱ्या परवानगीवरून पाकिस्तानने आज कोलांटी उडी मारली. या कॉरिडॉरमार्गे येणाऱ्या यात्रेकरूंकडे पासपोर्ट आवश्‍यक असल्याचे पाकिस्तानने आज म्हटले आहे. 

भारतातील गुरुदासपूर ते पाकिस्तानमधील कर्तारपूर येथे जाण्यासाठी कर्तारपूर कॉरिडॉर दोन्ही देशांनी विकसित केला असून, शनिवारी (ता. ९) या कॉरिडॉरचे उद्‌घाटन होणार आहे. कॉरिडॉरद्वारे येणाऱ्या भारतीयांकडे केवळ अधिकृत ओळखपत्र असावे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कालच (ता. ६) म्हटले होते. यावर भारताने पाकिस्तानला भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी पासपोर्ट आवश्‍यक असल्याचे सांगितले.