बांगलादेशच्या माजी पंतप्रधान झियांना पाच वर्षांचा कारावास

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

"झिया यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना कलम 409 व 109 अंतर्गत शिक्षा सुनाविण्यात आली आहे,'' असे न्यायाधीश मोहम्मद अख्तेरुझमान यांनी सांगितले. झिया यांचे पुत्र तारीक रहमान आणि त्यांच्या इतर चार सहकाऱ्यांनाही या प्रकरणी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान व सध्याच्या विरोधी पक्ष नेत्या बेगम खालिदा झिया यांना आज (गुरुवार) येथील न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपांतर्गत पाच वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनावली. एका अनाथाश्रमासाठी स्थापन करण्यात आलेल्या विश्‍वस्त मंडळाकडून अडीच लक्ष डॉलर्स "घेतल्या'चा आरोप झिया यांच्याविरोधात ठेवण्यात आला होता. त्यामध्ये त्या दोषी आढळल्या. हा आरोप म्हणजे राजकीय कारस्थान असल्याचा दावा झिया यांनी केला आहे.

"झिया यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना कलम 409 व 109 अंतर्गत शिक्षा सुनाविण्यात आली आहे,'' असे न्यायाधीश मोहम्मद अख्तेरुझमान यांनी सांगितले. झिया यांचे पुत्र तारीक रहमान आणि त्यांच्या इतर चार सहकाऱ्यांनाही या प्रकरणी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली.

झिया यांच्याविरोधातील या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर ढाका येथे त्यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे (बीएनपी) कार्यकर्ते व सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमक झाली होती. झिया यांना न्यायालयात नेण्यासाठी पोलिसांना हजारो कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला होता. झिया यांना झालेल्या या शिक्षेचे बांगलादेशच्या राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khaleda Zia Bangladesh Corruption South Asia