"तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर...",किम जोंगच्या बहिणीचा अमेरिकेला इशारा 

kim-yo.jpg
kim-yo.jpg

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला इशारा दिला आहे. "कोरियन द्विकल्पात परिस्थिती बिघडेल अशी कोणतीही कृती करु नका" अशी धमकीच किम यो जोंगने दिली आहे. किम जोंग उन पाठोपाठ त्यांची बहिण किम यो जोंगचा उत्तर कोरियाच्या राजकारणात प्रभाव आहे. किम यो जोंग भाऊ किम जोंग उनची मुख्य राजकीय सल्लागार आहे. बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जापान आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. हे दोन्ही देश अमेरिकेचे प्रमुख सहकारी आहेत.

पेंटागॉनचे प्रमुख लॉयड ऑस्टिन आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिनकेन सोमवारी जापानमध्ये दाखल झाले. हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. लष्करी सहकार्य वाढवून, चीन आणि अण्वस्त्र सज्ज उत्तर कोरियाविरोधात आघाडी भक्कम करणे हा दौऱ्यामागे अमेरिकेचा उद्देश आहे. 

अमेरिकेत सत्तापालट होऊन जो बायडेन सत्तेवर आल्यानंतर  पहिल्यांदाच उत्तर कोरियाकडून अशा प्रकारची आक्रमक भूमिका मांडण्यात आली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये मागच्या आठवड्यापासून संयुक्त युद्ध सरावाला सुरुवात झाली. 
"पुढची चार वर्ष तुम्हाला शांत झोपायचं असेल, तर सुरुवातीपासून तुम्ही असं काम करु नका की, ज्यामुळे तुम्हाला झोपच लागणार नाही" असा इशाराच किम यो जोंगने दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात विचित्र परराष्ट्रनितीमुळे उत्तर कोरिया बरोबर अनेकदा टोकाचा तणाव निर्माण झाला. युद्धाची स्थिती निर्माण केली गेली, त्यानंतर ट्रम्प यांनी किम जोंग उन बरोबर चर्चा सुद्धा केली. उत्तर कोरियाची अण्वस्त्र सज्जता संपवणं हा उद्देश होता. पण त्यात अमेरिकेला यश मिळालं नाही. याच अण्वस्त्र सज्जतेमुळे उत्तर कोरिया अनेक निर्बंधाचा सामना करत आहे. 

बायडेन यांच्या शपथविधीच्या आधी किम जोंग उनने अमेरिकेचा आपला पहिला शत्रू असल्याचे जाहीर केले. क्षेपणास्त्र सज्ज असलेल्या उत्तर कोरियाने लष्करी परेडमध्ये पाणबुडीतून डागता येणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइलचे प्रदर्शन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com