अण्वस्त्रविरहित होण्याचे किम यांचे आश्‍वासन; ट्रम्प यांचा सुरक्षेचा वायदा

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

चर्चेमधील मुख्य निर्णय 
- उत्तर कोरियाला संपूर्ण सुरक्षेची अमेरिकेची हमी 
- अण्वस्त्रविरहित होण्याचे उत्तर कोरियाचे आश्‍वासन 
- युद्धकैदी आणि कारवाईत बेपत्ता झालेल्यांना एकमेकांच्या ताब्यात सोपविणे 
- आणखी अनेक वेळा भेटण्याचा निर्धार- 
- उत्तर कोरियावरील निर्बंध तूर्त कायम 
- उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र चाचणी केंद्र नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू 

सिंगापूर: अमेरिकेवर अण्वस्त्रांचा मारा करण्याचे ध्येय असलेले उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरील भेटीत कोरियाची किनारपट्टी अण्वस्त्रविरहित करण्याचे आश्‍वासन दिले. त्यांच्या या आश्‍वासनामुळे आपल्या टेबलावर अण्वस्त्र सोडण्याचे बटन ठेवणाऱ्या किम यांनी आपल्या आक्रमक आणि आततायी भूमिकेपासून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या भेटीनंतर दोन देशांमध्ये नव्या संबंधांची सुरवात होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात आज सिंगापूरमध्ये बहुचर्चित आणि ऐतिहासिक भेट झाली. सुमारे पन्नास मिनिटे झालेल्या या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी अमेरिका-उत्तर कोरियादरम्यान शांततेवर आधारित संबंध सुरू करण्यासंबंधी सविस्तर चर्चा केली. कोरियाची किनारपट्टी अण्वस्त्रविरहित करण्याचा निश्‍चय किम यांनी बोलून दाखविताच त्याबदल्यात उत्तर कोरियाला संपूर्ण सुरक्षा पुरविण्याची हमी ट्रम्प यांनी दिली. सुरवातीला केवळ ट्रम्प-किम यांच्यातच चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळासह पुन्हा एक बैठक होऊन काही गोष्टी निश्‍चित करण्यात आल्या. त्यानंतर बैठकीमध्ये ठरलेल्या गोष्टींची नोंद असलेल्या कागदपत्रावर सह्या करण्यात आल्या. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्या अध्यक्षांमध्ये थेट भेट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

टीका ते स्तुती 
काही दिवसांपूर्वीच एकमेकांवर शेलक्‍या शब्दांनी टीका करणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी आज आपले मतही बदलले. या भेटीबद्दल आनंद व्यक्त करताना ट्रम्प यांनी किम यांचे कौतुक केले. "किम हे अत्यंत हुशार व्यक्ती असून, त्यांचे त्यांच्या देशावर नितांत प्रेम आहे. त्यांना आम्ही लवकरच अमेरिकला येण्याचे निमंत्रण देऊ,' असे ट्रम्प म्हणाले. आजची भेट झाल्याबद्दल आम्हाला आनंद असून, आम्ही दोघे जगासमोरील सर्वांत गंभीर प्रश्‍नही सोडवू. ही भेट अपेक्षेपेक्षा अधिक चांगली झाली असून, किम यांच्याबरोबर विशेष नाते निर्माण झाले आहे, असेही ट्रम्प म्हणाले. 

किम यांच्याबरोबर अत्यंत चांगली चर्चा झाली. उत्तर कोरियामधील अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरवात होईल. आम्ही आता पुन्हा वारंवार भेटू. 
- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका 

भूतकाळ मागेच सोडून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जगात आता लवकरच मोठा बदल झालेला दिसेल. 
- किम जोंग उन, अध्यक्ष, उत्तर कोरिया 

चर्चेमधील मुख्य निर्णय 
- उत्तर कोरियाला संपूर्ण सुरक्षेची अमेरिकेची हमी 
- अण्वस्त्रविरहित होण्याचे उत्तर कोरियाचे आश्‍वासन 
- युद्धकैदी आणि कारवाईत बेपत्ता झालेल्यांना एकमेकांच्या ताब्यात सोपविणे 
- आणखी अनेक वेळा भेटण्याचा निर्धार- 
- उत्तर कोरियावरील निर्बंध तूर्त कायम 
- उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र चाचणी केंद्र नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू 

एकमेकांसाठी... 
काही दिवसांपूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू असणाऱ्या ट्रम्प आणि किम जोंग उन यांनी आजच्या भेटीवेळी मात्र एकमेकांच्या भावनांचा आदर केला. वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या आधी जाण्याचा समंजसपणा दाखवत किम हे ट्रम्प यांच्या सात मिनिटे आधी भेटीच्या ठिकाणी हजर झाले होते. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा लाल रंग आवडता असल्याने त्याच रंगाचा टाय घालणे पसंत केले होते. या भेटीनंतर दोघांनी एकत्र भोजनही केले.

Web Title: korea Assurance of non-nuclear weapons; Trump Security Promise