कुलभूषण यांच्या सुटकेसाठी आईची पाकिस्तानकडे याचिका
कुलभूषण यांना वकील नाहीच
कुलभूषण यांना वकील दिला जाऊ नये अशी सूचना पाकिस्तानच्या लष्कराने तेथील सरकारला केली आहे.
इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आता त्यांच्या आईने फाशीच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानच्या अपिलीय न्यायालयात धाव घेतली आहे. कुलभूषण यांची फाशीची शिक्षा रद्द केली जावी अशी मागणी करणारी त्यांच्या आईची याचिका भारताने पाकिस्तानकडे सोपवली आहे. दरम्यान कुलभूषण यांना आपली बाजू न्यायालयामध्ये मांडण्यासाठी चांगला वकील मिळवून दिला जावा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे, मात्र पाकने ती पुन्हा फेटाळून लावली आहे.
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असून, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कथित हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जाधव हे गुप्तचर असल्याने त्यांना कायदेशीर मदत मिळवून देता येणे शक्य नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. द्विपक्षीय करारान्वये निर्धारित अटी आणि शर्ती येथे लागू होत नसल्याचा पुनरुच्चार पाकिस्तानने केला आहे. इस्लामाबादेतील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जानुजा यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचे निवेदन सादर केले होते.
बारावेळा वकिलाची मागणी
आतापर्यंत भारत सरकारने तब्बल बारावेळा पाकिस्तान सरकारकडे कुलभूषण यांना वकील देण्याची मागणी केली असून, पाकने मात्र ती वारंवार फेटाळून लावली आहे. कुलभूषण यांना वकील दिला जाऊ नये अशी सूचना पाकिस्तानच्या लष्कराने तेथील सरकारला केली आहे. चौदा एप्रिल रोजी बंबवाले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन हा मुद्दा उपस्थित केला होता, तसेच जाधव यांच्या भवितव्याबाबत चिंताही व्यक्त केली होती. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचा विचार करून जाधव यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जावी, असे भारताने म्हटले होते.
आईची साद
आता कुलभूषण जाधव यांच्या आईनेही या प्रकरणात पाकिस्तान सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी करत कुलभूषण यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताने कुलभूषण यांच्या आईचे म्हणणे पाकिस्तान सरकारसमोर सादर केले आहे. आता यावर पाकिस्तान सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.