असे होते अमेरिकन निवडणुकांचे शेवटचे काही तास...

केदार देशमुख, वेस्ट ब्लूमफिल्ड, डेट्रॉईट, मिशिगन
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

बराक ओबामांसह इतर अनेक बडी मंडळी प्रचारासाठी खूपवेळा येथे आली. तरी एकदाही ट्रॅफिक जाम झाला नाही. लाऊड स्पीकर, घोषणा, गाणी ऐकायला आली नाहीत. किंवा रस्त्यावर गुलालाचा सडादेखील पडला नाही.

मी मूळचा पुण्याचा, पण मिशिगनमध्ये काही वर्षांपूर्वी आलो. मी 2004, 2008 आणि 2012 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांच्या वेळी येथे होतो. 
पूर्वीच्या निवडणुकांच्या वेळी मिशीगन हा डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा. पूर्वीच्या तिन्ही निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा येथे विजय झाला. परंतु, यावर्षी डोनाल्ड ट्रम्पसाहेबांच्या कृपेमुळे मिशिगन 'टॉस अप स्टेट' बनलं. 

येथे निवडणूक अटीतटीची झाली, आणि रिपब्लिकन पक्ष जिंकण्याचीच शक्यता वाटत होती. याचे मुख्य कारण म्हणजे मिशिगनमधील कंपन्या, नोकऱ्या कामे परदेशात गेली आहेत. मागील काही वर्षांत त्यातील काही कंपन्या, नोकऱ्या, कामे परत मिशिगनमध्ये आली असली तरी तो रोजगार प्रामुख्याने पदवीधारकांसाठी आहे. त्या व्यतिरिक्त कारखान्यांत कामगारांचा रोजगार मेक्सिकोसह दक्षिणेतील इतर राज्यांत गेला तो गेलाच. याचा ट्रम्प यांनी चांगलाच उपयोग करून घेतला. 

टॉस-अप स्टेट झाल्यामुळे गेल्या दोन-चार दिवसांत येथे अगदी 15-20 मिनिटांच्या अंतराने बराक ओबामा, हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प प्रचारासाठी येऊन गेले. त्यांच्या सभांची वर्णने अगदी राष्ट्रीय स्तरावर झाली. 
मतदान केंद्र उघडायला अवघा एक तास बाकी असताना मी हे लिहायला घेतले. अवघ्या काही तासांत सगळं काही स्पष्ट झालं. बहुतेक सर्व मतदान चाचण्यांमध्ये हिलरी क्लिंटन यांना 4 ते 5 टक्क्यांची आघाडी मिळेल असे सांगण्यात आले. पण तरीही घडले उलटेच. 

या निमित्ताने आवर्जून नमूद करावेसे वाटते की, येथील आणि महाराष्ट्रातील तथा संपूर्ण भारतातील निवडणूक प्रचारांदरम्यान एक फरक प्रकर्षाने जाणवला. तो म्हणजे बराक ओबामांसह इतर अनेक बडी मंडळी प्रचारासाठी खूपवेळा येथे आली. तरी एकदाही ट्रॅफिक जाम झाला नाही. लाऊड स्पीकर, घोषणा, गाणी ऐकायला आली नाहीत. किंवा रस्त्यावर गुलालाचा सडादेखील पडला नाही. म्हणजे थोडक्यात गंमत म्हणजे आपल्याकडील लोकांना येथील निवडणुकांची मजा आली का हे सांगणं कठीण आहे.  
 

Web Title: last hours of us elections campaign